परंपरा -१


प्रत्येक मानव हा उदरनिर्वाहासाठी नौकरी, व्यवसाय करीत असतो. त्यामुळे समाजातील लोकांना त्याला भेटता येत नाही. त्याची समाजातील लोकांशी गाठ-भेट होत राहावी कदाचित यासाठीच समाजाने वेगवेगळ्या परंपरा लावून दिल्या असाव्यात असे माझ्या मनाला वाटत असते. वाढ दिवस साजरा करणे,सण साजरा करणे या परंपरा त्याच साठी सुरु झाल्या असाव्यात असे मला माझे मन सांगत असते.
आनंद असो वा दुख, मानव एकटा कधीच साजरा करू शकत नाही. त्यासाठी त्याला इतरांची गरज भासतेच. अचानक आनंद झाल्यावर व एकटा असल्यावर तो स्वतः आनंदाने उड्या मारतो. पण, त्यावर त्याचे समाधान होत नसते. त्याला तो आनंद इतरांसोबत वाटायचा असतो. इतरांना कधी सांगू असे त्याला होते. लगेच तो घराबाहेर पडतो. मित्रांना भेटतो व मनातील सर्व भावना व्यक्त करतो. त्यानंतर त्याला हायसे होते. आणि त्याच्या मनाचे समाधान होते. असा हा मानव प्राणी.दुख  झाल्यावर सुद्धा त्याला दुसऱ्याच्या खांद्याची गरज असतेच. आपल्या मनातील भावना तो इतरांच्या खांद्यावर आपले डोके ठेवून व्यक्त करतो तेव्हाच  त्याच्या मनाचे समाधान होते. दुखात असलेल्या व्यक्तीला जवळचा मित्र भेटल्यावर बघा तो लगेच हुंदके देवून रडायला लागतो. त्याच्या गळा लागून, त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडून घेतो. मन समाधानी झाल्याशिवाय तो शांतच होत नाही. मित्र सुद्धा त्याचे समाधान होई पर्यंत त्याला रडू देत असतो.

आपल्यावर असा प्रसंग कधी तरी आला असेल. एखाद्या दुखी मित्राला/ नातेवाईकाला भेटल्यावर त्याच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवता बरोबर तो रडायला लागतो. लांब कशाला जाता. आपले बालपण आठवा कि, लहान असतांना वडिलांनी मारल्यावर आपण घराच्या एका कोपऱ्यात रुसून बसतो. आई जाणून बुजून आपल्या जवळ येत नाही किंवा वडील तिला आपल्या जवळ येवू देत नाही. पण जो पर्यंत आई जवळ येत नाही तो पर्यंत आपण रडत नाही. एकदाचे वडील घराबाहेर पडले,  व आई जवळ आली,  कुशीत घेऊन मायेने पाठीवर हात फिरविला कि आपण जोरजोरात रडायला लागतो. म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी या परंपरा सुरु केल्या असाव्यात असे वारंवार माझे मन मला सांगत असते.

2 thoughts on “परंपरा -१

यावर आपले मत नोंदवा