विरहाच्या वेदनेने………..

विरहाच्या वेदनेने व्याकूळ (मी ),
विवक्षित विचलित विरस,
विचारांच्या वनात,
विचरत असतो दररोज.

दुःखाच्या दगडावर
दरडीच्या (काठावर)
दणदणीत दडपणाने दचकतो
आणि
दणकन दरीतील दलदलीत
पडतो  दररोज.

मन माझे मोहात
मग्न मदमस्त
(प्रेमाच्या) मदिरेच्या महापुरात
न्हाऊन निघते दररोज.

विरहाच्या वेदनेने………..

मनुष्य ,भाषा आणि गाणी.

माणसाचा मुळ स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याच्या ताब्यात असलेली वस्तू  आवडते. जसे मित्राने घातलेला शर्ट. तो त्याला खूप आवडतो, त्याचा रंग सुंदर असतो, पण तसाच शर्ट  जेव्हा तो स्वतः घेऊन घालतो तेव्हा त्याला तिसर्याचा  शर्ट  आवडायला लागतो. तो मनात म्हणतो ‘अरे यार ह्या रंगाचा शर्ट  घेतला असता तर छान  दिसला असता.’ आपली बायको किती ही सुंदर असली अप्सरा असली तरी माणसाला दुसऱ्याची सावली, जड जुड व बेढब दिसाराची बायको सुंदरच वाटते. हे फक्त मोठ्यांचे असते असे नाही. लहान मुलांचेच बघा न! त्याला महागड सुंदर खेळण आणून दिल तरी त्याला गरीब मुलाकडील मोडक तोडकं खेळण सुंदर वाटत. त्याला कोणीच दोषी नाही. हा मुळ स्वभावच आहे. याचा अभ्यास करूनच  आपल्या पूर्वजांनी एक म्हण तयार केली आहे “दुरून डोंगर साजरा ” किंवा हिंदी मध्ये ” दुरके   ढोल सुहाने” लांबून दिसत असलेला डोंगर आकर्षित करतो व जवळ जातो व त्या डोंगराची उंची बघून ते आकर्षण संपून जाते. लांब कोठे ढोलक वाजत असेल तर त्याचा आवाज सुरेल वाटतो आपण त्याकडे आकर्षित होऊन जवळ जातो तेव्हा तोच आवाज किंकाळीत परिवर्तीत होऊन जातो.
आपल्याला एक लाख रुपयाची लॉटरी लागली दोन लाखाच्या लॉटरीचे आकर्षण होते. आपल्यापेक्षा दुसऱ्याची नौकरी चांगली वाटत असते.मला त्या देवाचे कौतुक करावेसे वाटते की त्याचे ह्या जगाची निर्मिती करतांना, मानवाची निर्मिती करतांना खूप बारकाईने विचार केला सर्व बाजूने विचार केला आहे. तो उपरवाला अप्रतिम इंजिनिअर आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. विचार करा जर त्याने मानवाला असे आकर्षण दिले नसते तर जगण्यात अर्थच उरला नसता. हे आकर्षण आहे म्हणून मनुष्य धावतो आहे नाही तर बसला असता झाडा खाली आंबे पेरू खाली कधी पडता आहेत व कधी खायला मिळणार याची वाट बघत. संशोधन कशाला केली असती त्याने.

तसेच भाषेचे ही असते. दुसऱ्याची भाषा आपल्याला छान वाटते, मन ती भाषा शिकायला उत्सुक असते. आणि दुसऱ्याची भाषा शिकायला हवी सुद्धा. त्याने आप आपसातील  प्रेमभाव  वाढतो, मैत्री वाढते. दुरावा कमी होतो. आपण आपला मुलगा एक दोन इंग्रजी शब्द बोलला कि त्याचे किती कौतुक करतो. तसेच कौतुक एक भाषिक दुसर्या भाषेत बोलतो तेव्हा करायलाच हवे तसे केल्याने त्याला हुरूप येतो आणि मग तो ती भाषा शिकायला सूर करतो. त्याला त्यातून आनद मिळतो.
राजकपूर च्या पिक्चर रुस या देशात खूप चालत असत असे मी ऐकले होते. त्यांना भारतीय पिक्चरचे गाण्यांचे खूप आकर्षण होते. “मेरा जुता ही जपानी” हे त्याचं गाण खूपच गजल होत. आज ही जगाला भारतीय गाण्यांचे खूप आकर्षण आहे. तो चीनी असो, जपानी असो, इंग्रज असो किंवा आणखी कोणत्या देशातील रहिवाशी असो, त्याला हिंदी गाण्यांचे आकर्षण असतेच पण ते गटात सुद्धा. त्यांच्या तोंडून ती गाणी ऐकायला ही सुंदर वाटतात. मला यु. ट्यूब वर अशीच काही विदेशी गायकांनी गायलेली हिंदी गाणी सापडली आहेत ती मला आवडली म्हणून येथे शेअर करीत आहे.  विशेष करून ह्या चीनी मुलीने अप्रतिम आवाज व लायामध्ये गाणी गायली आहेत. बघा व ऐका.

माझे स्वप्न

काल रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी पाहिले कि मी “सहजच” आकाशात “बेधुंद” होऊन उडत होतो. वरतुन मला “एक बिन भिंतीचे घर” दिसले. त्या घराच्या समोर एक मोठी फळी लावलेली दिसली ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते “मराठी ब्लॉग विश्व” त्या घराच्या अंगणात जिकडे तिकडे “पाला पाचोडा” पसरलेला दिसला. अचानक  एक वाऱ्याचा  झोका आला आणि “मन उधाण” होऊन वाऱ्यासोबत उडू लागले. उडता उडता “थोडेसे मनातले” लिहावे ह्या हेतूने विचार करू लागलो आणि “काय वाटेल” ते लिहायला काय हरकत आहे असे उगाचच वाटून गेले. उडतांना खाली पडलेल्या पाला पाचोड्यावर सिंपडलेल्या “दवबिंदू” मधून सूर्य किरणांमुळे इंद्रधनू तयार झालेला दिसला आणि “माझिया मना”“स्पंदन” जाणवू लागली. इतक्यात त्या काल्पनिक इंद्रधनु भोवती एक भुंगा घिरट्या घालत आहे असे डोक्यात भुणभूणु लागले. त्यामुळे मी “ये रे मना ये रे मना” अशी हाक मारुन “माझ्या मना”ला बोलावु लागलो तेव्हा माझे मन मनातल्या मनात “हरे कृष्णा हरे कृष्णा” म्हणण्यात गुंतले होते. म्हणुन माझ्या तोंडुन अनायासे हे शब्द बाहेर पडले “मनाचिये गुंती” आणि मला कसलेही भान(स)च राहिले नाही.मी “दुनियादारी”च विसरलो.
हळु हळु मी भानावर आलो आणि मी समोरच एक सुन्दर “मोगरा फुललेला” पाहिला. त्या मोगऱ्याचा सुवास मला आकर्षित करू लागला आणि मी खाली येऊ लागलो. खाली येता येता लेंडिंग करीत  असणाऱ्या विमानाचे चाक अचानक अडकून पडल्याने जे  होते तसे माझे ही झाले आणि मी पलंगावरून खाली कोसळलो.

(ही पोस्ट लिहितांना ज्या मित्रांच्या ब्लॉग ला लिंक देता आली नाही त्यांनी क्षमा करावी)

गौरवोद्गार

माझी कन्या रसायन शास्त्र हा विषय घेऊन एम. एस. सी. च्या पहिल्या वर्षाला आहे. सध्या गेदरिंगचे दिवस  सुरु आहेत. तिच्या कोलेज मध्ये सुद्धा गेदरिंग  होते. ती भाग घ्यायला तयारच नव्हती. तिने फावल्या वेळेत काही स्केच काढली आहेत आणि काढत ही असते. ती स्केच तिच्या ब्लॉग वर डिस्प्ले केलेली आहेतच. तिच्या मैत्रिणींनी आग्रह करून तिला काही निवडक स्केचेस गेदरिंग मध्ये डिस्प्ले करायला सांगितले. तिने सहज म्हणून केले ही. काल कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी पारितोषिक  वितरण  समारंभात तिला दुसऱ्या क्रमांकाचे  पारितोषिक  मिळाले.
मला अत्यानंद झाला. हा आनंद शेअर करावा असे मला वाटले म्हणून लिहित आहे. आपल्या मुलांचे कौतुक आपण आई वाधीलांनी केले तर त्यांना जास्त प्रोत्साहन मिळते असे माझे मत आहे. तुमचे मत काय आहे?

होते असे कधी कधी…

मी सहजपणे मुलीने आग्रह केला म्हणून माझ्या मना हा एक ब्लोग तयार केला आणि बघता बघता चार पाच ब्लोग तयार झाले. जास्त लक्ष माझ्या मनावरच दिले गेले कारण आपली मातृ भाषा. इंग्रजी, हिंदी या ब्लोगवर जास्त लक्ष केंद्रित करता आले नाही. थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला लागल्यावर हुरूप आला आणि रोज लिहायला पाहिजे असे झाले व मी त्याच्या आहारी गेलो. झाले एक सवय काही कमी होती सिगारेट ओढायची कि हि दुसरी  सवय जडली. बायकोला सिगारेट म्हणजे सवत वाटायची आता त्या सवतीला सवत आल्या मुळे बायको हैराण झाली. सकाळी उठल्यावर काही कोमेंत्स आल्या आहेत का? हे पाहिल्या शिवाय चैन पडत नाही. सायंकाळी घरी आल्या आल्या मेल चेक करणे. थोडा वेळ बायको सोबत नाराजीनेच का होईना सोफ्यावर बसून वाकड्या तोंडाने गप्पा मारणे. मारणे म्हणजे एक तर्फीच कारण ती बोलणार व मी न ऐकल्यासारखे करणार. माझे सर्व लक्ष आज काय लिहावे याकडे. मनात विषय घोळत राहणार. विषय सापडला कि काय लिहावे यावर चिंतन.

पण मागे माझ्या मुलीची पोस्ट वाचली तेव्हा जाणवले कि आपण ब्लॉगच्या जास्तच आहारी गेलो आहे. ती पोस्ट वाचून बर्याच ब्लॉगर्स च्या कोमेंट्स आल्या. अनिकेतने तर आधीच  अलविदा म्हणायचे ठरवून टाकले होते. हळूं हळू मी ब्लोगवरील लक्ष कमी करत गेलो. पूर्वी माझ्या मनाचे नाव पहिल्या चार मध्ये कसे राहील हे मी पाहत होतो. मला वाटते मागच्या महिना भरापासून माझ्या मना पहिल्या चार वर नाही. तेथील जागा आता सुरेश पेठेजी आणि दुनियादारी यांनी घेतली आहे.

सध्या कामाचा व्याप खूप वाढला आहे. त्यामुळे विषय शोधणे व त्यावर मनन करून लिहिणे शक्य होत नाही. कामातून व घरच्या विषयातून लक्ष विचलित होते. म्हणून आता ब्लोग लिहिणे कमी केले आहे. नेटवर बसणेच आता कमी केले आहे. मला वाटते हि नैसर्गिक क्रिया आहे. माणसाला तेच तेच करून कंटाळा येत असतो. म्हणून तो काही वेळा त्यातून बाहेर पडतो.( लग्नाच्या बेडीतून शक्य नाही 😦 ) मी अलविदा म्हणणार नाही कारण तशी माझ्या कन्येची ताकीदच आहे पण अधून मधून भेटत राहणार. कदाचित पुनः हुरूप आला किंवा फ्रेश झालो तर नव्या जोमाने पुनः लिहायला सुरुवातकरणार.

जस्ट फन.कॉम

मित्रांनो सहज यु ट्यूब वर फनी व्हीडीओ सापडला. म्हटलं गंभीर वातावरणात थोड हसून घ्याव म्हणून येथे देत आहे. बघा हसा आणि मस्त राहा. हा हा हा.