या वर्षी माझी बदली होणार आहे अशी चर्चा माझ्या कानापर्यंत आली आणि अस्वस्थता वाढली होती. मला नाशिक मध्ये राहून १४ वर्ष झाली आहेत. मागील ७ वर्षापासून नाशिकातील माझ्या कार्यालयाशी तेथील कामाशी प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे. ती आता नाहीशी होणार या कल्पनेने मन कासावीस होत होते. अचानक एके दिवशी एक फोन आला आणि माझी पुण्याला बदली झाली असे समजले. क्षणभरासाठी श्वास जगाच्या जागी थांबल्यासारखे झाले. शासकीय दौऱ्यावर होतो, लगेच फोन फोनी करून तपास केला बातमी खरी होती. मग मनाला समजावले आणि ते शांत झाले. अस्वस्थता कमी झाली.
पण ज्याक्षणी या कार्यालयातून बदली झाली हे समजले त्या क्षणी मला एक विचित्र जाणीव झाली. त्या क्षणी माझ्या मनाचा या कार्यालयाशी संबंध तुटला असे वाटले, हे कार्यालय परके वाटू लागले. आणि हळूहळू मनाची ओढ नव्या कार्यालय कडे होत गेली. हे मन असेच असते का? मी खूप विचार केला. मुलीला सांगितले. एखाद्या मुलीचे लग्न जुळले कि ती परकी हून जाते तेव्हा तिच्या मनाची काय घालमेल होत असेल? तिला त्या क्षणी माहेर परके वाटत असेल का? आणि सासरची ओढ जाणवत असेल का? हे मी माझ्या अर्धांगिनीला विचारले. तिने हसून होकार दिला.
आणि तो दिवस उजाडला २३ जून २०१० रोजी मी पुणेकर झालो. पुण्याला नवीन कार्यालयात हजर झालो. नवीन कार्यालयातील स्टाफ खुपच आवडला. सहयोगी खूप चांगले आहेत. मदत करत असतात. सहकार्य करतात. ज्या दिवशी मी पुण्याला हजार झालो त्या दिवशी श्री सुरेश पेठे साहेब माझी आतुरतेने वाट पाहत होते. त्याच दिवशी आम्ही भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला.
प्रथम मी एकट्याने पुण्याला राहायचा निर्णय घेतला होता. पण हळू हळू मला जाणवायला लागले कि एकटे राहणे शक्य नाही. लॉज वर राहणे बाहेरचे खाणे, बाहेरचा चहा पिणे मला अवघड जायला लागले. इकडे मुलगी आणि सौ. एकटेच त्यामुळे माझे सर्व चित्त त्यांच्यात. दुसऱ्या- तिसऱ्या दिवसा पासून मनाची ओढ घराकडे व्हायची. अस्वस्थता वाढायला लागायची. आता मला जनावायाले लागले होते कि पक्षी रोज सायंकाळी घराकडे का वळतात? आता मला घराचा विरह काय असतो त्याची जाणीव व्हायला लागली होती. एकटे राहिल्याने सिगारेट वरील ताबा सुटला होता. आणि एका महिन्यात मला जीना चढायला त्रास जाणवायला लागला होता. घरच्यांशी सल्ला मसलत करून मग सर्वांनी पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्यय घेतला.
आणि मग सुरु झाली माझी धावपड. कॉलेज मध्ये प्रवेश, घराची शोधाशोध. अनेक लोकांना भेटणे. घर बघणे. प्रत्येक घरामध्ये काही न काही त्रूटी सापडायच्या. कोठे घर लहान, कोठे घर पसंद पडायचे तर वेस्टर्न कमोड असायचे. शेवटच्या दिवशी पौड रोडवर एक पसंतीचे घर मिळाले आणि लगेच घेऊन टाकले.
आता नाशकातून काही वर्षांसाठी का होईना बाहेर राहणार आहोत. पुढील बदली होईपर्यंत तरी. नाशकात स्वतःचे घर आहे त्यामुळे अधून मधून चक्कर असणारच. पण आता या पुण्या नगरीला बाय बाय करायची वेळ आलेली आहे.
बाय बाय नाशिक…………..