प्रतीक्षा…

माणसाला जन्माला आल्यापासून मातीत विलीन होई पर्यंत अविरत प्रतीक्षा करावी च लागते. इच्छा असो अगर नसो.

अहो इतकेच कशाला, जन्म घेण्यासाठी सुद्धा नऊ महिने वाट बघावी लागतेच न!

आणि मेल्यावर सुद्धा स्मशानभूमीत जळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. शहरातील लोकसंख्या भरमसाठ वाढलेली असल्याने बर्याच वेळा स्मशानात जाळण्यासाठी रांगेत थांबावे लागत असल्याचे मी पाहिले आहे.

बाळ लहान असते आणि आई-बाबा नौकरी करत असल्याने त्यांना सकाळी बाईची वाट बघावी लागते. संध्याकाळ झाली कि बाळाला आई येण्याची वाट बघावी लागते. शाळेत जायला लागला कि बसची वाट बघणे आलेच. संध्याकाळी शाळा सुटण्याची वाट बघणे.

नंतर नौकरी ची, लग्नाची, आई, बाबा होण्याची, घर घेण्याची, गाडी घेण्याची, (हे खरेदी करण्याच्या ऐपतीवर अवलंबून आहे), नंतर मुलांच्या लग्नाची , नातवंडांची आणि म्हातारपणी शेवटाची आणि त्यानंतरही ही प्रतीक्षा काही केल्या संपत नाही. भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी यांची प्रतीक्षा करत ते प्रेत ताटकळत असत. जीवंत असतांना ज्यांनी कधी मदत केलेली नसते त्यांची वाट त्या प्रेताला पहावी लागते.

हे झालं आणि एकदाची प्रेतयात्रा निघाली कि बिचारा सुटला मोहजालातुन अस त्याला ही वाटत असावं. पण छे, ही प्रतीक्षा काही केल्या त्याचा पिच्छा सोडत नाही.

कारण, स्मशानभूमीत गेल्यावर सुद्धा बिचारा प्रतीक्षाच करतो.

शेवटी तो क्षण येतो. आणि त्याची अखेरची भेट ठरते प्रतीक्षेसोबत

ओम शांती