स्वार्थी जग हे…

होय मित्रांनो, जग हे खूप स्वार्थी आहे. जगातला प्रत्येक जीवंत प्राणी , जीव, जंतू, वनस्पती, झाडे, झुडपे सर्व सर्व स्वार्थाने भरलेले आहे. सुरुवात तर मी ईश्वरापासूनच करेल. मला वाटते त्याने हे जग त्याच्या स्वार्थासाठीच  निर्माण केले असावे. ईश्वराने हे जग निर्माण केले नसते तर त्याला कोणी पूजल असत? म्हणजे त्याची कोणीतरी पूजा करावी म्हणून मानव निर्मित केला असावा. मानव जगला पाहिजे म्हणून झाडे, झुडपे , वनस्पती, जीव जंतू निर्माण केले. त्यांच ही स्वतंत्र अस्तित्व नाही. ते ही एक दुसऱ्या वर अवलंबून आहेत. आहे न विचार करण्यासारखी गोष्ट. आता आपण माणसाकडे वळू या. पहिल्यांदा आईवडील म्हणजे स्री पुरुष ज्यांच्या पासून नवीन जीव निर्माण होतो. ते त्यांच्या म्हातारपणी आपला सहारा व्हावा म्हणून मुलं आसावीत. त्यासाठी लग्न करतात. आणि मुलांना जन्माला घालतात. यात त्यांचा स्वार्थ नाही का? स्पष्टपणे स्वार्थ आहे. त्याला लहानाचे मोठे करतात. नको नको ते लाड पुरवतात तेही तो नाराज होऊ नये. मोठेपणी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून. जर मोठा झाल्यावर त्याने त्रास दिला तर तसे बोलून दाखवतात ही. यासाठीच का तुला लहानाचा मोठा केला? तुझे लाड पुरविले. असे उघडपणे बोलतात. यात त्यांचा स्वार्थ स्पष्टपणे दिसून येतो. नव्हे असतोच. पूर्वी वडिलांशी संवाद साधणे अशक्यप्राय होते. ते तरी काय करणार? घरोघरी इतकी मुलं असायची कि वडील कोणाकोणाला जवळ घेणार हा प्रश्न असायचा. त्यामुळे लाड नकोच. असे तेव्हाचे धोरण असावे.
असे म्हणणे उचित होईल कि  मुल स्वतःहून लहानाची मोठी व्हायची. तेव्हा ची मुल निस्वार्थ पणे काम करायची. कारण धाकच असा होता. पाय चेपून दे जरा म्हटलं तर निमूटपणे जाऊन चेपून द्यावे लागे. मला वेळ नाही, मी अभ्यास करतोय. ही कारणं चालतच नसायची. ऐकायचं म्हणजे ऐकायचच.
आता त्या लहानशा पिल्लाला जरी काम सांगितले तरी तो चॉकलेट देणार? म्हणून विचारतो. पप्पी देणार? इतपर्यंत ठिक होतं.पण चॉकलेट म्हटलं तर. लहानपणी काम करण्यासाठी चॉकलेट मागितले कि समजून जायला हवं कि हा मोठेपणी काय काय दिवे लावणार!! अहो अभ्यास करण्यासाठी मार नाही खात आता चॉकलेट खातात मुलं. आणि आई!! आईच तर विचारुच नये. मुलाने काम करण्यासाठी खाऊ मागितला कि मुलाची आई मध्ये बोलणार च. अहो एकूलत एक लेकरू आहे तुमच. एक रूपयाचं चॉकलेट तर मागतोय. पूर्वी अस नसायचं. वडील बाहेरून घरी आले आणि वडिलांनी फक्त त्याच्या कडे पाहिले तरी तो समजून जायचा आणि पळतच घरात घुसायचा. तेही समोर नव्हे. कुठे तरी कानोड्यात जाऊन लपून बसायचा. चॉकलेट तेव्हा नव्हतेच. साध्या लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या. पण त्या हि मागणे अशक्यप्राय गोष्ट होती.  समजा चुकून माकून मुलाने मागितलीच तर  आईच ओरडायची आणि झाडू घेऊन खाऊ पाहिजे तुला. आई मारणार नाही पण उगारणार. तरीही मनात आईविषयी आदरयुक्त  भिती असायची.
हल्ली प्रत्येक जण आपला स्वार्थ बघतो. लहान मुल असो, आईवडील असो किंवा आणखी कोणी. काही फायदा असेल तरच काम करायच. नाही तर संबंध ठेवण्यात काही हशील नाही. असे बोलून सुद्धा दाखवणार.
हे तर माणसांचं झालं. अहो पशूपक्षी सुध्दा स्वार्थ जपतात. तुम्ही त्याला खायला दिले तरच तो तुमच्या जवळ येणार. शेपटी हलवणार किंवा पायाशी लोळन घालणार. तुम्ही एक दोन दिवस दिले आणि नंतर दुर्लक्ष केल तर त्याच वागणं बघा. तो सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो. अगदी जवळ नव्हे थोड लांब थांबणार. तुमच्या न बघता नजर ठेवणार. तुम्ही आवाज दिला तरी दुर्लक्ष करणार, न ऐकल्यासारखे करणार. दोन तीन वेळा आवाज दिल्यावर हळू तुमच्या कडे बघणार. पण भावनाशून्य नजरेने.  हा हि स्वार्थच नाही का??

आईवडील, भाऊ बहिण, मुलं, नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी,  सहकारी सर्व सर्व जगच स्वार्थी झालयं.
मित्रांनो, विषय खूप मोठा आहे. पण आता मला ही लिहायचा कंटाळा आला आहे आणि तुम्हाला ही वाचायचा कंटाळा येईल म्हणून आटोपट घेतो.
लेख आवडला का? आलडला असेल तर प्रतिक्रिया अवश्य द्या.
आणि माझ्या या स्पष्ट भावनांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
(4821864)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.
आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.
तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!

🌹🌷शुभ प्रभात🌷🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

www. koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

स्वयंशिस्त..

ईश्वराने या ब्रम्हांडाची रचना करताना काही विशिष्ट नियम घालून दिले आहेत आणि त्या नियमानुसारच हे संपूर्ण ब्रम्हांड सदैव कार्यरत असते. या नियमांत किंचित ही बदल होत नाही. दररोज सकाळ होणार, सूर्य उगवणार, मग दुपार, सायंकाळ मग रात्र, पुन्हा सकाळ. हे चक्र अविरत सुरू आहे. यांत किंचित ही फरक पडत नाही. इतकेच नव्हे तर उत्तरायण व दक्षिणायन हे सुद्धा ठरलेल्या दिवशीच होतात. तेव्हा सूर्य दक्षिणेला कलतो किंवा उत्तरेकडे सरकतो. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी हे निसर्गचक्र शोधून काढले. यात यत्किंचितही बदल झाला तर वादळं येतात. अतिपाऊस येतो. हाहाकार माजतो.

निसर्ग ज्या प्रमाणे नियमितपणे व निमूटपणे आपले काम करतो, नियमांचे पालन करतो. त्याप्रमाणे मनुष्य करतो का? नाही. नियम मोडणे जणू माझा हक्क आहे असाच मनुष्य वागत असतो. जर माणसांनी ही काटेकोर पणे नियम पाळले तर आयुष्यात वादळं येणे शक्य नाही.

आता ह्या कोरोनाचेच घ्या न. लॉकडाऊन का केला सरकार ने. आजाराची लागण होऊन तो पसरू नये म्हणून न. लोकं घरात राहिली, एक दुसऱ्या च्या संपर्कात आले नाही तर लागण होत नाही. पण काही लोकांनी ठरवलेले असते. नियम पाळायचे नाही.

मी घराबाहेर पडत नाही. असे सांगितले तर काय बोलतात माहिती आहे? तुम्ही खूप घाबरता. असे घरात बसून राहिले तर तब्येत खराब होईल. बाहेर पडा. काही होत नाही. आता काय बोलणार आपण. मनातल्या मनात बोलतो कि बाबा रे मला बाहेर जायचे काही कारण नाही. सेवानिवृत्त माणूस आहे. वयस्कर आहे. विनाकारण आपल्याला स्वतःला अडचणीत का टाकावे? आपण तर आपण सरकारला ही अडचणीत का आणावे. तुम्ही म्हणणार तुमच्या एकट्याने बाहेर पडल्याने सरकार कशी काय अडचणीत येईल.

आता हे बघा मी जसे काही होत नाही, बाहेर पडू असा विचार केला. तसाच विचार त्याच वेळी इतर हजारों लोकांच्या मनात आला तर. समजा ६० वर्षापुढील लोकांनी घराबाहेर पडायचे असे ठरवले. शहराची जनसंख्या २० लक्ष असली आणि शहरात ६० वर्षापुढील लोकं जनसंख्येच्या २० टक्के असली तर एकाच वेळी शहरातील रस्त्यावर ४ लक्ष लोकं फिरतील की राव. आपण फक्त २ टक्के धरले तरी ४०’००० लोकं होतात.

म्हणून स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असते.

हे फक्त याच बाबतीत नव्हे. रस्त्यावर वाहन चालविताना ही स्वयंशिस्त पाळायला हवी. पोलीस असेल तर सिग्नल वर थांबायचे असे योग्य नाही. एक निरिक्षण सर्वांनी कधी तरी केले असेलच. सिग्नल वर हिरवा सिग्नल पडण्याची वाट पहात गाड्या उभ्या आहेत. पोलिस जवळपास नाही. हे बघून एक दुचाकी स्वार पटकन गाडी काढतो. तेव्हा तो एकटा जातो का? नाही. त्याच्या पाठोपाठ ३-४ तरी निघून जातात. त्यांना बघून बरेच सरसावले असतात. त्यातील काही शिस्तबद्ध रितीने वाहन चालवणारे असतात. ते म्हणतात जाऊ दे १ मिनिटांत काय आकाश कोसणार नाही. असे मुद्दाम जोरात म्हणतात. जेणेकरून आजूबाजूच्या मंडळींना ऐकू जावे. म्हणजे ते ही थांबतील. काही असे असतात कि जे जाऊ कि नको जाऊ कि नको असा विचार करत असतात.पण पुढे जात नाहीत. अशा प्रकारच्या लोकांना निर्णय लवकर घेता येत नाही.

काही भित्रे असतात. ते चहूबाजूला तपासून बघतात कुठे पोलिस आहे का? या निरिक्षणामुळे ते थांबलेले असतात व पुढे जाण्यास धजावत नाहीत. यातील आणखी एक प्रकार असतो. ते म्हणजे घाबरटच. इतके घाबरट असतात कि सिग्नल हिरवा झाला आणि मागचे हॉर्न वाजवत असले तरी सावकाश पुढे सरकतात.

असो. पण असं लाल सिग्नल ओलांडताना दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी आली तर केव्हढा मोठा अपघात होईल. बर सिग्नल मोडणाराचा अपघात झाला तर शिक्षा झाली असे म्हणता येईल. पण सिग्नल पाळणारा सुद्धा यात भरडला जातो. तसेच लाल सिग्नल पडायची वेळ होत असल्याने ते वाहन वेगात असते. जोरदार अपघात होतो. इतर वाहनांवर पण जाऊन आदळू शकतात. आणखी कशासाठी. तर अर्धा मिनिटे वेळ वाचविण्यासाठी. ऐरव्ही आपण टिव्ही समोर तासनतास बसून असतो. व्हाट्सएपवर तासनतास पडून असतो. पण सिग्नल वर अर्धा मिनिट सुद्धा वाट बघायची तसदी घेत नाही.

म्हणून म्हणतो मित्रांनो, स्वयंशिस्त फार महत्वाची असते.

चला तर मग, घरी रहा, सुरक्षित रहा.

(4721863)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वेळ दिसत नाही पण खुप काही दाखवते.
आपलेपणा ही खुप जण दाखवतात
पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते.
🌹🙏 सुप्रभात🙏🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.rnk1.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तिखटमीठ

संपतराव हात पाय धुवून स्वयंपाक खोलीत नव्हे स्वयंपाक घरात आले.खोली म्हटलं कि गावंढळपणा डोकावतो अर्थात असे त्यांची बायको सतत टोकत असते. पण मुळात गावाखेड्यात वाढलेला माणूस काही ही झाल तरी बदलू शकत नाही. असो तर ते आले बायकोने नुकतेच टेबलवर वाढून ठेवले होते. ते बसले भाजी बघून तोंडाला पाणी सुटले. पण भाजी कसली आहे याचा उलगडा ज्यांना चव घेतल्यानंतर सुद्धा होत नाही, त्यांना त्या भाजीकडे बघून कसा होणार. म्हणून ते गुपचूप खुर्चीवर बसले. ताट ओढून जवळ घेतले. पोळीचा तुकडा मोडला. भाजीच्या प्लेट मधे टाकून कुसकरून घेतला आणि पहिला घास छोटासा ताटाच्या बाजूला ठेवला. ही त्यांची लहानपणापासूनची आजीने लावून दिलेली सवय. का माहिती नाही पण त्यांना तसे केल्याशिवाय जेवण करताच येत नाही. असो. तर त्यानंतर चा घास त्यांनी स्वतःला भरवला आणि ज्या वेगाने त्यांच्या भाजीविषयी आशा पल्लवित होऊन तोंडाला पाणी सुटले होते अगदी त्याच वेगाने त्या आशा धुळीस मिळाल्या आणि तोंडचे पाणी ही पळाले. कारण होते भाजी. भाजीत तिखट नव्हतेच मुळी. आज प्रथमच संपतरावांना राग अनावर होऊन ते बायकोवर चिडून ओरडले. अग काय हे? ही काय भाजी आहे?

४० वर्षे झाली संसार करून तरीही अशी चुक! संपतराव कधी नव्हे ते आज चिडले होते. बायको तशी तापट होती. तिला त्यांच रागावण सहन झालं नाही. जितक्या जोरात संपतराव ओरडले त्यापेक्षा दुप्पट जोराने बाईसाहेब ओरडल्या. तिचं हे इतकं जोराने चिडणं आज पहिल्यांदा त्यांनी बघितलं होतं. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या लक्षात हे कधीच आले नव्हते कि क्रिकेट मधे जितक्या जोरात बॉल येतो तितक्याच वेगाने तो उंच आणि लांब जातो. हळू आलेल्या बॉलवर सिक्सर लागत. वेगात बॉल आला कि सिक्सर सहज लागतो. अगदी असच झाल आहे हे. आज प्रथमच संपतराव चिडले आणि त्यांना बायकोचे हे रुप दिसले.

ते थोडे शांत होत बायकोला म्हणाले, “भाजीत तिखट टाकलेले नाही.”

आता ती ही शांत होत म्हणाली “चुकून राहिले असेल टाकायचे.”

अहो, माझ ही वय झाले आहे आता. चाळीस वर्षे संसाराला झाली कधी झाले होते का असे?

“नाही हो कधीच नाही. पण मी ही काय करावे. रात्रंदिवस काम करणारा माणूस आयुष्य भर पायाला फिरक्या लावल्यागत धावपळ करत राहिलो. आता हे दिवसभर नुसते बसून राहणे सहन होत नाही. काही करायची ताकत नाही. नुसत हतबल होऊन बसायचे. वेड लागायची पाळी येते कधी कधी. आज तर हद्द झाली. भाजीत चक्क तिखटच नाही. मला राग अनावर होऊन मी चिडलो.”

“बरोबर आहे तुमचं. चिडचिड होणारच. माझं ही चुकलं मी इतक्या जोरात ओरडायला नको होते. मी ही काय करणार बर. काम होत नाही. कसं तरी स्वयंपाक करायचा. आणि तुम्हाला माझ्या हातचच जेवण हव असत. म्हणून झटाव लागत. माझी ही चिडचिड होते आता.”

“हो ग. हे म्हातारपण व्यतित करण खूप कठिण असतं बुआ.”

“मला ही तसच वाटतं. अहो मला वाटतं भाजी तिखट मीठ शिवाय पूर्ण होत नाही. तस आपल आयुष्य ही पूर्ण होत नाही. आपण अस केलं कि रोज काही तरी कारण काढून पाच मिनिटे भांडत जाऊ. मग दिवसभर त्या विषयावर चर्चा करू. आपला वेळ मस्त जाईल नाही का?”

हो ग. कल्पना अप्रतिम आहे. लोकं प्रेमाने आयुष्य घालविण्यासाठी प्रयत्न करतात. आपण तिखट मीठ लावून आयुष्य चविष्ट करु. मला आवडली बुआ ही कल्पना.”

“ठरल तर मग.”

“हो पण या नादात भाजीत तिखट मीठ घालायला विसरू नका.☺️☺️

आणि दोघे ही जोरजोरात हसायला लागले.

(4621862)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

माणुस मनापर्यंत पोहोचला …
तरच नातं निर्माण होतं …
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!

असे जगा की आपली ‘उपस्थिती’ कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
पण आपल्या ‘अनुपस्थितीची’ उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!

🙏🏻🌹शुभ सकाळ🌹🙏🏻

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

घुसमटलेले…

एका लहानशा खेड्यात जन्मलेले संपतराव शिक्षण आटोपल्यावर शहरात आले. खेडेगावात शेतीशिवाय कामच नसल्याने त्यांना शहरात येणे भाग पडले. सरकारी नोकरी मिळाली आणि त्यांचं जीवन मान सुरू झालं. मग लग्न, मुलं आणि दर ३-४ वर्षांनी शहरात आणि कार्यालयात बदल. अहो, बदल्या. शेवटी त्यांनी इतरांप्रमाणे सेवानिवृत्तांचे शहर म्हणून पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. तसं पुणे त्यांचे साठी नवीन नव्हते. पूर्वी येथेही बदलीवर आले होतेच ते. सेवानिवृत्ती नंतर सहकुटुंब राहायचे म्हटले कि सर्वांच्या संमतीने घर घेणे इष्ट होते. म्हणून प्रथम भाड्याने रहावे असे ठरले. त्यानुसार मध्यवर्ती ठिकाण निवडून भाड्याने फ्लॅट घेतला. सामान्य घरात तेही खेडेगावात जन्मलेला मनुष्य मोठ्या सुशिक्षित लोकांमध्ये लवकर मिसळत नाही. संपतराव तसे मोठे अधिकारी होते. पण लहानपणापासून शहराचे मनावरील दडपण काही केल्या जात नाही. काही लोकं असतात तशी पण ती विरळाच. त्यांना भिती ही नसतेच. म्हणून ते जेथे जातात तेथील माणसांना वातावरणाला लगेच आत्मसात करून मिसळून जातात. संपतराव सारखी माणसं मोठ्या शहरी लोकांशी बोलण्यापूर्वी शंभर वेळा काय बोलावे, कसे बोलावे हा विचार करतात. मग बोलायचा प्रयत्न करतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. ती व्यक्ती फार पुढे निघून गेलेली असते. शहरात लोकांना बोलायला सवड नाही हे त्यांच्या मनाला पटत नाही. शहरातील संस्कृती वेगळीच असते. जोरात हसलो तरी बायको म्हणते. हे काय. लोकं काय म्हणतील? ही कोण अनाडी लोकं आलीय शेजारी.  म्हणजे मनसोक्त हसता ही येत नाही. कोणाच्या ही घरातून हसण्याबोलण्याचा आवाज येत नाही. आला तरी क्वचितच. संपतरावांना मनसोक्त हसण्याची सवय. म्हणून येथे त्यांची घुसमट होते.टिव्ही चा आवाज हळूच ठेवा. शेजारी नावे ठेवतील. घरात उघडे पागडे बसू नका. लोकं काय म्हणतील. जेवताना किती आवाज करतात तुम्ही. लोकं काय म्हणतील.  शहर खूप सुंदर आहे. हिरवेगार आहे. जिकडे तिकडे झाडेच झाडे. सकाळी ३-४ पासून पक्ष्यांची कलरव सुरु होते. कोकीळ तर!  किती छान कोकिळ ची कुहू कुहू.  असे वाटते सर्व शांतता असावी आणि फक्त कोकिळ गात रहावी. सोबत इतर पक्षी आणि चिमण्या असतातच साथ द्यायला. पहाटेचे ३ व दुपारचे ३ वाजेला पक्ष्यांची कलरव सुरू होते. संपतरावांचा आवडता कार्यक्रम असतो हा. डोळे बंद करून कान सताड उघडे ठेऊन निवांत पणे ऐकायचे हे निसर्गाचे संगीत.  या नैसर्गिक संगीताचे रसपान झाले कि त्यांचे मन त्रुप्त होऊन जाते. मग त्यांना कशाची ही गरज वाटत नाही.
शहर इतके घुसमटलेले असते कि शेजारी कोणी गेलं तरी कळत नाही. चार पाच लोकं येतात शववाहिनी येते. संपला विषय कुणी रडत सुद्धा नाही. रडले तर गावंढळपणा दिसून येतो. अहो मनात भावना अडकून पडतात त्याचं काय? पण आपल्याला काही ही करता येत नाही. मनात ल्या मनात घुसमटत बसावे लागते. जेव्हा प्रथम शहरात प्रवेश केला होता तेव्हा तर संपतराव लहान होते. नोकरी लागली तर ऑफिसमध्ये डबा खायला सहकाऱ्यांसोबत सोबत जेवण करायला ही लाजिरवाणे वाटायचे. त्यांना आवडेल का आपण सोबत बसलेल? असा प्रश्न पडायचा. वरिष्ठ अधिकारी काय खातात याची सतत उत्सुकता असायची. एके दिवशी नेमकं साहेब जेवण करत असताना च त्यांनी बोलावलं. आता त्यांची घालमेल सुरू झाली. उत्सुकता इतक्या शिगेला पोहोचली कि त्यांना न बघता राहवल गेल नाही. तेव्हा संपतरावांनी साहेबांच्या डब्यात डोकावून पाहिले तर कोबीची भाजी होती. आता कोठे संपतरावांची उत्सुकता शमली. अरेच्या ही मोठी लोकं ही सामान्यांसारखी भाजीच खातात! तेव्हा त्यांना उलगडा झाला कि माणसाकडे किती पैसा आला, जग खरेदी करु शकेल इतका जरी पैसा जवळ असला तरी खायला त्याला पोळी भाजी सारखे अन्नपदार्थ च खावे लागतील. हिरे मोती सोन चांदी खाऊ शकत नाही कोणी. जन्माला येताना नागडाच येतो तो जरी अतिश्रीमंत घरात जन्माला आला तरीही. किंवा गरीबाच्या घरी जन्मला तरीही. अहो आयुष्यभर मरमर करू पैसा जमा करतो पण मरताना सोबत नेतो का? रिकाम्या हातीच परत जातो न!

आता अश्या स्वभावाच्या साध्याभोळ्या माणसाकडून काय अपेक्षा असणार?
असो. असे हे संपतराव!!☺️☺️
घुसमटलेले. बायको म्हणते बुरसटलेले. तिच्या मते माणसाने कालांतराने बदलले पाहिजे. जो बदलत नाही तो बुरसटलेला.
असो. आपल्याला काय त्याचं☺️
(4521861)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐 चांगली भूमिका,
चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे
लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
🙏🙏शुभ सकाळ!🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.ownpoems.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ऑक्सिजन चे मुल्य

कोरोना ने आपल्याला खूप काही शिकवून दिले आहे. तसा माणसाचा स्वभावधर्म आहे कि जे मोफत असते त्याला शून्य लेखायचे. म्हणजे त्याचे महत्त्व कमी असे समजून घ्यायचे. जसे पाणी जवळजवळ मोफतच असते. निसर्गाने दिलेली एक देण आहे ती. पण मोफत असल्याने आपल्या लेखी त्याला अत्यल्प महत्त्व. वाटेल तस वापरायचं. ज्या भागात आठ आठ दिवस नळांना पाणी येत नाही. जेथे १०-१० मैलांवरुन पाणी आणाव लागत. अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विचारा पाण्याचे मोल काय असते ते.

अगदी ऑक्सिजन चे ही तसेच आहे. पाणी तरी डोळ्यांना दिसते. ऑक्सिजन तर दिसत सुद्धा नाही. त्यामुळे तिला महत्त्व आहे हे किंवा तिच्या अस्तित्वाची कल्पना आपल्याला नसते. आतापर्यंत दवाखान्यात गेल्यावरच तेही आयसीयु मधे रुग्णाला ऑक्सिजन दिल्याचे दिसत होते. पण आता रस्त्यावर लोकांच्या हातात, घरोघरी हे सिलिंडर दिसत आहेत. ऑक्सिजन अभावी लोकं मरत आहेत. आता माणसाला ऑक्सिजन चे व पर्यायाने निसर्गाचे महत्त्व पटले असेलच. अर्थात वन जंगल झाडे यांचे आपल्या साठी काय महत्त्व आहे हे लक्षात आले असेलच. आता तरी मानवाने डोळे उघडावे.

नॉर्मल माणसाला दिवसात दोन सिलिंडर ऑक्सिजन लागतो. असे ग्रुहित धरले. आणि एका सिलिंडर ची किंमत रु. ४००/- याप्रमाणे वर्षाला…. आणि साधारण पणे ६५ वर्षे आयुष्य असते असे मानले तर आपण….४००x२x३६५x ६५ =रु.१,८९,८०,०००/- म्हणजे जवळजवळ २ कोटी रुपयाची ऑक्सिजन आपण आयुष्यभरात प्राशन करतो. ती ही अगदी मोफत. ज्या अद्रुष्य शक्तिने हे ब्रम्हांड रचले आहे, हे ऑक्सिजन ची निर्मिती करणारे व्रुक्ष निर्माण केले आहेत, त्या अद्रुष्य शक्तिची कुठलीही क्रुतज्ञता व्यक्त न करता ही ऑक्सिजन आपण प्राशन करतो. आणि तेच ऑक्सिजन निर्माण करणारे व्रुक्ष आपण तोडतो. जंगल आपण तोडतो. परत ते उभ राहायला किती वर्षे जातात. अहो पुन्हा तसे जंगल उभे राहातच नाही. नैसर्गिक क्रिया असते ती आपल्या केल्याने होत नाही. मी जेथे लहानाचा मोठा झालो, तेथे लहानपणी घनदाट जंगल होते. हळूहळू ते नाही से झाले. आता परत तसे जंगल उभे राहिले नाही.

आता आपल्याला ऑक्सिजन चे महत्त्व पटायला लागले आहे. आता तरी झाडे लावण्याचे मनावर घेतील लोकं असे वाटते.

आता कोणती झाडे ऑक्सिजन देतात त्याच्या पोस्ट वायरल होत आहेत. त्यात वडाचे झाड ही येते. हे झाड सैकडो वर्षे टिकणारे आहे. घनदाट असल्याने ऑक्सिजन ही मोठ्या प्रमाणात देत असावे. मला वाटतं ह्या झाडाचे रोपण मोठ्या प्रमाणात झाले तर योग्य होईल. विशेष म्हणजे याच्या फांदीचे रोपण केले तरी ती जगते. मी स्वतः तसे केले आहे. जवळपास १५ वर्षे झाली असावीत. आता ते खूप मोठे झाले असावे. २-३ वर्षापूर्वी त्याचा फोटो मी मेरी नाशिक येथून मागवला होता. तो येथे टाकत आहे.

पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा कडूनिंब आणि वडाची झाडे खूप लावलेली दिसायची. कदाचित त्याचे कारण हेच असावे. आता ती नाहीशी झालीत.

असो.

ता.क.:- आजच वर्तमानपत्रात चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झाल्याची बातमी वाचली. त्यामुळे ही पोस्ट त्यांना समर्पित करतो.

झाडे लावा झाडे जगवा

हा मंत्र अंगी बाळगावा.

(4421860)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जीवनात मागे बघाल तर

अनुभव मिळेल..

जीवनात पुढे बघाल तर

आशा मिळेल..…

इकडे -तिकडे बघाल तर

सत्य मिळेल…

आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर

आत्मविश्वास मिळेल

🙏🏻शुभ सकाळ🙏🏻

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.ravindra1659.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ध्येय म्हणजे टारगेट.

पिंकी हातात मोबाईल घेऊन बटन दाबून शरीर वाकडे तिकडे करत असल्याचे आजोबांनी पाहिले. अग बेटा काय करते आहेस. चल लवकर जेवण करायला.

तर पिंकी म्हणाली, होय आजोबा आलेच. आज शाळेला सुट्टी होती. म्हणून ती घरी होती. तिचे आई वडील कामाला गेले होते. वारंवार हाका मारुन ही पिंकी येत नव्हती. तेव्हा आजोबा स्वतः उठून तिच्या जवळ गेले. त्यांना येताना पाहिलेआणि ती पुन्हा ओरडली. आलेच न मी आजोबा. आणि तीने मोबाईल तसाच खाली ठेवला आणि आजोबांना जाऊन बिलगली. मी येतच होते न आता.

अग का उशीर करत होती.

अहो आजोबा मी गेम खेळत होते. मग काय त्यात. जेवण केल्यावर सुद्धा खेळता येतो की.

तस नाही न आजोबा. टारगेट पूर्ण झाल्या शिवाय थांबता येत नाही. म्हणजे त्याशिवाय गेम थांबवता येत नाही का? तस नाही आजोबा, आपल मन मानत नाही. जोपर्यंत टारगेट पर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत परत परत खेळावस वाटत. थाबताच येत नाही एकदाचं टारगेट पूर्ण झाले कि त्या खेळातील क्रेझ निघून जातो. मग परत तो खेळ खेळण्यात आनंद येत नाही. पिंकी चे बोल ऐकून आजोबा शून्यात हरवून गेले. विचारात मग्न झालेले पाहून ती म्हणाली, काय झाले आजोबा?

काही नाही बेटा,चल मी वाढतो. आपण जेवण करून घेऊ.

जेवण झाल्यावर वामकुक्षी घेण्यासाठी आजोबा नातीला घेऊन पलंगावर पहुडले. नात पुन्हा मोबाईल वर खेळायला लागली आणि आजोबा विचारात मग्न झाले.

दोन वर्षापूर्वी अचानक धर्मपत्नी गेल्यावर त्यांना एकटेपणा जाणवायला लागला होता. नात मुळे थोडा वेळ निघून जायचा. पण अर्धांगिनी गेल्यावर काय वाटतं हे ते क्षणा क्षणाला अनुभवत होते. जो आला आहे त्याला परतीचा प्रवास हा करावाच लागतो. किंबहुना असे म्हणणे योग्य होईल कि मनुष्य जन्माला आल्यापासून त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो. फक्त स्टेशन कधी येईल याची वाट बघावी लागते. काही स्टेशनं येतात ही. पण तेथे तात्पुरते उतरून पुन्हा पुढील प्रवास सुरू होतो. कारण ते आपले गंतव्य नसते. अर्थ लक्षात आला असेलच मित्रांनो. जीवन प्रवासात गंभीर आजार येतात. तेथून वाचलो म्हणजे आपलं ते स्टेशन नव्हते हे समजावे.

जन्मल्यापासून मनुष्य ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असतो. अगदी लहान असताना खेळणी घेण्यासाठी रेंगाळत पुढे जातो. मग चालण्यासाठी धडपडतो. मग शाळेत पास होण्यासाठी किंवा पहिला येण्यासाठी. मग चांगल्या करिअर साठी इंजिनिअरिंग, मेडिकल, आय ए एस, इ. साठी धडपड. नंतर घर, मग लग्न, मग मुलं, त्यांच करिअर, त्यांच लग्न, इ.इ. हे चक्र सुरू च आसते. न संपणार, न थांबणारं आहे हे सर्व.

पण हे कुठे तरी थांबायला हवं. मुलं नोकरीला लागली, त्यांच लग्न झालं कि त्यांना त्यांच आयुष्य जगु द्यायला हवं. त्यांचं चक्र सुरू करू द्यायला हवं. नाही तर त्यांना त्यांच्या पुढील पिढीला ह्या चक्रात अडकवता येणार नाही. या चक्रात अडकल्याशिवाय त्याला जगताच येणार नाही.

एकदाच वय झालं, ध्येय पूर्ण झालं कि स्वतःला या मोह मायेतून सोडवून घेणेच योग्य. पण ध्येय पूर्ण होणं गरजेचं आहे. नाही तर त्यात जीव अडकून राहतो. अरे हे राहून गेले. ते राहून गेले. असे करता आनंदी जगावे.

पुन्हा तोच प्रश्न पडतो कि हे जीवन कशासाठी दिले आहे देवा? जन्माला आला, शिक्षण नोकरी लग्न मुल नितवंडं आणि परतीचा प्रवास. मग यातून काय साध्य झाले देवा? तुला हे ब्रम्हांड घडवून काय मिळाले? एका जीवासाठी एव्हढा अट्टाहास का देवा?? मानव तयार करून त्याला जीवंत ठेवण्यासाठी अख्ख ब्रम्हांड तयार करावं लागलं देवा. केव्हढा हा त्रास घ्यावा लागला तुला देवा. आम्हाला तुझी लेकरं समजून माफ कर देवा.

(4321859)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

चांगल्या वागणूकीचे आर्थिक मूल्य नसले तरी त्यात कोट्यवधींची मने जिंकण्याची ताकद असते.

💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.koshtirn.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वाद आणि संवाद

आज निवांत क्षणी मोबाईल लांब ठेऊन बायको सोबत गप्पा माराव्या म्हणून शेजारी बसलो. तर बायको म्हणते “काय झालं? मोबाईल कसा सुटला आज.”

“अग तू नेहमी एकटी असतेस. म्हणून तुझ्या सोबत गप्पा मारायला आलोय मी.” मी प्रत्त्युत्तरादाखल बोललो.

यावर बायको ताडकन बोलली.आता तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव स्पष्ट दिसत होता.”काय म्हणता!! आज सूर्य नारायण पश्चिमेला उगवले वाटतं.!!”

“असेल बुआ. मला नाही माहित.” आम्ही काही न कळल्याच्या आविर्भावात.

“ते जाऊ द्या. काय काम आहे ते सांगा.” बायको लगेचच मुद्द्यावर आली.

“मला एका प्रश्नाचे उत्तर देशील का?” आम्ही सुद्धा मुद्द्यावर येवून आपली गुगली टाकली.

“बस्स एव्हढंच. विचारा की.” ती.

“मला माहित आहे तू हजर जबाबी आहेस. तरीही विचाराव म्हटलं.”

“हंहं” आखाड्यात एक पहेलवान दुसऱ्या ला जसं चेलेंज करतो त्या आविर्भावात बायको बोलली.

“वाद” आणि “संवाद” यात फरक काय..? मी प्रश्न फेकला.

मला माहिती आहे कि तिला लेक्चर द्यायला भारी आवडते. म्हणून मी जमिनीवर मांडी घालून तिच्या समोर बसलो. असा बसलो तीला हुरूप येतो आणि मग ती ताडताड बोलायला सुरुवात करते. आता ही असेच घडले. मला श्रोत्यासारखे समोर बसलेलं बघून तिने बोलायला सुरुवात केली.

“अहो, सोप्पं आहे.”

“हो हो। सांग न मग.”

” हे बघा , वादातुन भांडणे हाेतात आणि संवादातून चर्चा होते. आणि चर्चेतून बरच काही स्पष्ट हाेत जातं. बरोबर आहे न!” बायको छान मुद्द्यावर आली होती.

‘हो हो.” आम्ही होकारार्थी मान डोलावली.

“आता दुसरा मुद्दा बघा. वाद कशातून होतो. तर वाद अहंकार आणि संकुचित मनातुन हाेताे. आणि संवाद! संवाद तर सहज माेकळ्या मनातुन हाेत असतो. येथे अहंकाराचा थांगपत्ता ही नसतो. दोन्ही मनमोकळेपणाने बोलत असतात. मनाचा संकुचित पणा ही संवादात नसतो. हेही पटल असेल.?” प्रतिसाद न मिळाल्याने तिने विचारले.

“हो ग. पटल मला.” मी ही होकार दिला.

“आणखी पुढे ऐका. “वादातून” रागाची अभिव्यक्ती होते, तर
“संवादातून” तर्काची अभिव्यक्ती होते. मुळात वाद हा रागातूनच उत्पन्न होत असतो. याउलट संवादातून सहज तार्किक चर्चा होऊन समुद्र मंथनासारखे काही तरी चांगले बाहेर पडते.” बायको.

“अग काय छान प्रवचन देतेस ग तू.” मी तिला आणखी प्रोत्साहित केले.

तर ती आणखी पुढे बोलू लागली. ” वादातुन “काेण बराेबर” हे सिध्द करण्याचा प्रयत्न हाेताे आणि….”

मी मधेच थोड गंभीर बनलेलं वातावरण हलकं करण्यासाठी बोललो.

“जसे नेहमी तूच बरोबर असल्याचा प्रयत्न करत असतेस.”

“गप्प बसा हो. पुढे ऐका.” तीची चांगलीच तंद्री लागली होती. मी ही पुन्हा ऐकायला सुरुवात केली.

“संवादातून “काय बराेबर” हे सिध्द करण्याचा प्रयत्न हाेताे.” हे ही पटलं असेलच.?”

” हो अगदी. मनापासून.” आम्ही.

” अहो, वादातून नेहमी “निरर्थक” प्रश्न निर्माण होत असतात आणि
संवादातूनतुन प्रश्न “मार्गी लागत असतात.”

आणि ती माझ्या तोंडाकडे बघत राहिली.

मी ही प्रश्नार्थक नजरेने तिच्या कडे बघत राहिलो.

आणि अचानक ती म्हणाली, 🌻”आपला दिवस आनंदात जावाे. शुभ सकाळ.”

“अग, हे काय शेवटी ?’

“जिस स्कूल मे तुम पढे हो न बाबू वहाँ के हम प्रिंसिपल थे। हा हा हा.” जोरजोरात हसत बाईसाहेब म्हणाल्या.

आम्ही तिच्या कडे आ वासून बघत बसलो.

“अहो हा सकाळ संदेश. तुम्ही आज बघितला असणार. मी कालच वाचला. तोंडपाठ झाला मला.”

“का पण.”

“अहो, आपल्या घरात रोजच सुरू असते हे. म्हणून संदेश आवडला.”

“काय सुरू असते ग.”

“अहो मी करते तो संवाद.”

“हो का!!! आणि मी??”

“तो वाद.” ताडकन उत्तर तोंडावर आपटलं.

पुन्हा वाद नको म्हणून ममी गुपचूप उठलो आणि दुसऱ्या खोलीत गेलो.

(4221858)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रामाणिक नाती ही पाण्यासारखी असतात, रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाची असतात.

👍शुभ सकाळ.👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manachyakavita.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मन कोवळे हे…

कोरोना आल्या पासून सोशल डिस्टेंसिंगच पालन करता करता माणसं एक दुसऱ्या पासून लांब होत चालली आहेत. कोणाकडे जाणे नाही कि येणे नाही. पैशाची देवाणघेवाण पण मंदावली आहे. शहरामध्ये तरी लोकं शक्य तो कार्डचा वापर करून पैसे देतात. सद्यस्थितीत होम डिलिव्हरी मागविण्यात येत आहे. आम्ही पण तेच करत आहोत. ऑनलाइन पेमेंट केले तर चांगले असते. सामान आला कि घरत दारा जवळ ठेवायला सांगता येते. आम्ही सामान लगेच आवश्यक नसेल तर पडून असतो ३-४ दिवस. नंतर उचलून ठेवतो. पण काही वेळा सिओडी म्हणजे घरी पैसे द्यावे लागतात. तेव्हा त्याला ही प्रश्न पडतो आणि आपल्याला ही. पूर्ण रक्कम असली तर फक्त देऊन टाकायचे. परत घ्यायचे असले कि काळजी.

घरी सामान मागवला. सिओडी असल्याने आल्यावर पैसे द्यायचे होते. त्याला दिले तर नाही म्हणाला. बरोबर आहे. त्यालाही भिती असतेच की. त्याने मशीन आणले होते. कार्ड पेमेंट करा म्हणाला. ठिक आहे म्हटले आणि कार्ड दिले. तर मशीन मध्ये कार्ड टाकायचा प्रश्न. कोणी टाकावे. त्याने मशीन समोर केली. मी कार्ड घालायचा प्रयत्न केला तर अशक्य. आपल्या हाताने मशीन धरल्याशिवाय कसं घालणार. शेवटी त्याने मशीन व्यवस्थित धरले तेव्हा मी कार्ड इंसर्ट केले. परत मशीन त्याने घेतली . त्यात रक्कम इ. काय असेल ती माहिती भरली. परत कार्डची पिन टाकण्यासाठी माझ्या कडे मशीन आणली. मी पिन टाकली आणि एंटर की दाबली. कनेक्टिंग अशी अक्षरं दिसली आणि मला हायसे वाटले. झाले बुआ एकदाचे. असा सुस्कारा सोडला. तो काही सोडावा लागत नाही. नैसर्गिक रित्या होणारी क्रिया आहे ती. पेमेंट झाले रिसिप्ट बाहेर पडली. त्याने मला ती दिली. अजाणतेपणी मी घेतली ही. तो हुशार. कार्ड परत देतांना त्याने मशीन माझ्या समोर केले. मला कळेना. तो म्हणाला कार्ड घ्या तुमचे. नंतर मी विचार केला किती ही झाले तरी कुठल्या तरी प्रकारे संपर्क हा येतोच. पण माणसाला भिती ने किती ग्रासले आहे. तो ही माणूस आपणही माणूसच. दोघांना भिती. मला वाटते यापेक्षा डिजिटल पेमेंट पद्धत स्पर्शाविना होते. दोघांचे म्हणजे आपला आणि दुकानदाराचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असेल तर पेमेंट करणे एकदम सोपे झाले आहे. फक्त एप उघडा. समोरच्याचा मोबाईल क्रमांक त्यात टाका. त्याचे नाव आले कि रक्कम टाकून पेमेंट करा. कुठे ही स्पर्श नाही. मी अजून तरी ही पद्धत वापरलेली नाही. वय झाल्यावर जरा रिस्क घ्यायची भिती वाटते. तरी होईल. हळूहळू करू. शेवटी काळा सोबत मार्गक्रमण करणे आलेच. जगासोबत चालला नाही तो मागे पडतो. असो पण या कोरोनाने माणसाला खूप काही शिकवले आहे. आपल्या जीवनात खूप बदल झाला आहे तो या कोरोनामुळेच.
(4121857)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर ते केव्हा आणि कसे वापरायचे याचे ही ज्ञान असावे लागते
💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.ownpoems.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कर नाही त्याला…

कर नाही त्याला डर कशाला?? जर काही केलेच नाही तर घाबरायचे कशाला? अशा अर्थाची ही म्हण. येथे कर म्हणजे कर्म.
तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचीती ॥ ध्रु ॥ येथे कर म्हणजे हात असा होतो.

आणि

संपत्ती कर, आयकर, विक्री कर, असे हे सरकारी कर.

खरच भाषा ही संवाद साधण्याचे साधन असले तरी तेथे एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात किंवा एकच शब्द अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो, तेव्हा तिची गहनता आणि महानता ही कळते. भाषा ही विलक्षण असते.

पण मित्रांनो, बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की वरील जो कर शब्द आहे त्याचा योग्य अर्थ हात असाच आहे.

अधिक स्पष्ट सांगायचे झाले तर पहिला कर म्हणजे कर्म. येथे जैसे जाचे कर्म तैसे फल देई भगवान. वरची पायरी चढणे अगर उतरणे यासाठी हाताची गरज भासतेच. म्हणजे कर्म हे जीवनातील पुढील वाटचालीसाठीचे एक साधन आहे.

दुसरे कर म्हणजे सरळ सरळ हातच. येथे आपण हात जोडतो. म्हणजे प्रार्थना करतो. ती ही भविष्यात चांगले जगता यावे यासाठी. अर्थात हे ही एक साधनच आहे.

आणि तिसरे कर म्हणजे संपत्ती कर, आयकर, विक्री कर हे सुद्धा हातच आहेत सरकार चे. यांच्या शिवाय सरकार पुढील वाटचाल करूच शकत नाही. आपल्या साठी ही हे हाताचेच काम करतात. आपण कर देतो म्हणून शहराची, देशाची प्रगती होते. पर्यायाने आपली ही प्रगती होते.

तसा आपला मुळ विषय संपला आहे. पण चालता चालता आणखी एक कर असतात ते ही सांगावे म्हणतो. ते म्हणजे शहराच्या नावापुढे जोडलेला ‘कर’. म्हणजे लक्षात आलं असणारच. आडनावे. गावाच्या किंवा आपण राहतो त्या ठिकाणाच्या नावावरून आडनाव ठेवणे. हे जे असतात न ते ही शहरासाठी त्याचे हातच असतात. त्यांच्या मुळेच तर ते शहर नावारूपाला येत असते.

( 04021856)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

स्वप्नांकडे बघून जगायला शिका. तीच तुम्हाला जगाण्याची हजारों कारणं देतील.

💐💐शुभ सकाळ💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.manacheslok.blogspot.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जीवनाचे सत्य..

आज एका व्हाट्सएपच्या ग्रुपवर कोणीतरी खालील जीवनातील कटू सत्य सांगणारा संदेश टाकल्याचे पाहायला मिळाले.

✍..

मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो
हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे
खर तर तुमची फक्त वेळ आहे
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे
नाही तर सर्व जवळचे असुन सुध्दा दुरचे…
हेच जीवनाचे सत्य आहे…..!!!

शुभ सकाळ 👍

संदेश बोलका आहे. चार ओळीत संपूर्ण जीवन कथन केले आहे.

असे विचार संपतरावांच्या मनात येऊन गेले.

आयुष्यभर मुलाबाळांच्या भवितव्यासाठी खस्ता खातो तर ते करिअर साठी आईवडिलांना म्हातारपणी एकटे सोडून लांब निघून जातात.

का? रग्गड पैसा कमवणे म्हणजे करिअर का? आणि इतका पैसा कमवून काय करणार? म्हातारपणी जसे आमची पिल्लं एकट सोडून गेली तशी तुमची पिल्लं ही सोडून जातीलच! त्यांना पण त्यांच करिअर घडवायचं असणारच की. तु रग्गड पैसा कमवून राहायला मोठे ४-५ बेडरूम चे आलिशान घर घेणार. आणि त्यात दोघेच राहणार. तडफडून मरण्यासाठी. दोघांपैकी एक गेलं कि शेवटी एकच राहणार त्या आलिशान घरात सडून मरण्यासाठी कि मरून सडण्यासाठी. हे खरे आहे मित्रांनो. अशा बातम्या येतच असतात.

संपतरावांनी बायकोच आजारपण आयुष्यभर भोगलं. तिला पाहिजे तिथे घेऊन गेले औषधी साठी. कसं ही करून बर लागावं म्हणून. आपल आयुष्य पणाला लावल. काय काय भोगलं.

आणि म्हातारपणी आलेलं आजारपण बायकोला असह्य होतय. काय होतय हे विचारणे सोडा ते स्वतः सांगू इच्छितात तर ती ऐकून घ्यायला ही तयार होत नाही.

संपतरावांचा अतुट विश्वास होता आपल्या बायकोवर कि जरी मुलं लांब गेली तरी बायको तसे करूच शकणार नाही. मी तिचं केल म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून. पण त्यांचा विश्वास तुटला.

म्हणून म्हटलं मी वरील संदेश बोलका आहे.

नाही तरी कोरोनाने हे दाखवून दिले आहे कि कोण तुमच्यावर किती प्रेम करतो. कोरोना झाला हे समजताच सर्व अगदी सर्व बायका मुलांसकट, आई बापासकट सगळे लांब पळतात.

( 03921855)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

इच्छेतून हक्कात आणि

हक्कातून शब्दात जी उमटते

ती खात्री…

स्मृतीतून कृतीत आणि

कृतीतून समाधानात जी दिसते

ती जाणीव…

मनातून ओठावर आणि

ओठावरून पुन्हा मनात जाते

ती आठवण…

🌹शुभ सकाळ🌹

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐