मनू-का?

मित्रांनो, गेल्या वर्षी मुलीने मांजरीचे पिल्लू दत्तक घेऊन घरी आणले होते. (हो, प्राण्यांना ही दत्तक घेता येते.) तत्पूर्वी कधी ही आम्ही कोणीही कुठल्याही प्राण्याच्या जवळ गेलो नव्हतो. त्यामुळे त्याला जवळ घेणे म्हणजे एक दिव्य होते. माझी व मिसेस ची प्रक्रुति बरी नसते म्हणून तिला सांभाळणे अशक्य झाले शेवटी आम्ही दुसऱ्या एका व्यक्ती ला तिला दत्तक दिले. पण ती कायमचे मनात घर करून गेली. नेहमी तिची आठवण आम्हा सर्वांना येत असते. खालील फोटो हा तिचाच आहे. खूप निरागस आणि शांत स्वभावाची होती ती.

२६ सेप्टेंबर २०२१ च्या रात्री सुमारे १०.३० वाजेला रस्त्यावरून मांजरीच्या पिल्लू चा रडण्याचा आवाज आला आणि आमच्या मुलीचे लक्ष्य तिकडे गेले. बालकनीतून पाहिले तर रस्त्यावर एकटे पिल्लू फिरत होते. कदाचित रस्ता विसरले असेल. बराच वेळ वाट पाहिली. कोणीच आले नाही. मग मुलीने आग्रह धरला. इतक्या रात्री ते पिल्लू बिचारे कुठे जाणार. आपण त्याला घेऊन येऊ. सकाळी पाहिजे तर सोडून देऊ. मी पण तिचा बापच. मला ही दया आली. आणि आम्ही दोघे तिला घरी घेऊन आलो. ती लगेच आमच्यात रुळली. इच्छा असूनही तिला सोडून देता आले नाही. बर्याच वेळा खाली बगिच्यात घेऊन गेलो. तिची नजर चुकवून घरात आलो. थोड्या वेळाने ती दारात हजर असायची. पुन्हा जिन्यावरून खाली जायचा प्रयत्न केला. तळाशी गेलो कि लगेच धावून घरात पळत जाणार. म्हणजे तिला कळत असावे कि हे मला बाहेर सोडायचा विचार करत आहेत असे. हळूहळू तिच्यात जीव रमत गेला आणि आता तर ती घरातील एक सदस्य होऊन बसली आहे. पण तिचा सांभाळ कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. असो. आता तर ती माझ्या मुलीसारखी झाली आहे. मी तिला बेटा बेटा करत असतो. बायको तर म्हणते ती माझी आई म्हणजे तिची सासू आहे. मग मला ही तिच्यात आई दिसते. मुलगी म्हणते ती तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे जे लहानपणी वारले. असो हे आम्ही गमतीने म्हणत असतो. पण मन कधी तिच्यात गुंगत गेले कळलेच नाही. एक मात्र झाले कि माझा वेळ तिच्यामुळे कसा निघून जातो कळत ही नाही. दिवसभर तिच्या भोवती फिरत असतो आणि ती माझ्या भोवती असते. ती नाही दिसली कि अस्वस्थ होते. तिला येऊन दोन तीन दिवस झाले असताना मी तिला म्हटले मनु का तू? आणि तिचे नाव मनुच पडले. तिला ही ते नाव खूप आवडते. मी तिला मनु बेटा असा आवाज दिला कि हुं…… असा होकार देते. आणि धावतच जवळ येते.

ही आमची मनू

माझी तर अत्यंत लाडकी झाली आहे ती. खूप मस्ती करत असते.