स्थलांतर……

पुर्वी बहुतेक भारतीय लोकं खेडेगावातच रहात असत. आवागमनाची साधने ही कमीच होती. एस.टी. सुध्दा कमीच होत्या. त्यामुळे एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी पायी किंवा बैलगाडी ने प्रवास केला जात होता. हे माझ्या लहानपणी.

वडिलांच्या लहानपणी तर म्हणे पायी किंवा घोड्यावर बसून प्रवास होत असे.

लग्न सुद्धा जवळपास असलेल्या खेड्यात च होत असत.

तेव्हा शहरं नव्हतीच मुळी.

काळ बदलत गेला. शहरं वाढली. उद्योग आले. लोकांचे स्थलांतर गावांकडून शहरांकडे सुरु झाले. आणि शहरं नगरात रूपांतरित होत गेली.

मग नगरांची महानगरं झाली. गावातील मंडळी नगरात व नगरातील महानगरात स्थलांतरित होत गेली.

पुढे आणखी काळ बदलला. शिक्षण वाढलं. आता जगाची दारं उघडली गेली आणि मुलं विदेशात शिक्षण घेऊ लागली. मग काय? एकदा मुलगा विदेशात गेला कि परत येणार नाही हा विचार मनात ठेऊनच पालक मुलांना शिकायला पाठवू लागले. झालं स्थलांतरित होण्यासाठी आणखी एक जागा मिळाली. ती म्हणजे “विदेश”.

आणि आता तर जग परग्रहावर विस्थापित होऊ पाहातयं. म्हणजे कदाचित याच किंवा पुढील दशकात मानव चंद्रावर राहायला सुरुवात करेल. बातम्या ही वाचायला मिळतात कि चंद्रावर प्लॉट पडलेत. काही लोकांनी तर विकत ही घेतले. असो.

स्थलांतरित होण्यासाठी गाव ते नगर, नगर ते महानगर, तदनंतर विदेश व पुढे परग्रह अशी स्थानं आहेत असे दिसून येते.

प्रवास चित्रण

यां रविवारी मी नाशिकला गेलो होतो. अर्थात ‘ओफिसिअली ऑन टूर’. बसचा सुखद प्रवास…….. सोबत सेमसंग वाय गेलेक्सी होताच. माग काय. संपूर्ण प्रवासात खिडकीतून फोटोग्राफी करत गेलो. एकटाच होतो. थोडा वेळ लोकसत्ता आणि म टा वाचून काढला आणि बातम्या एन्जोय केल्या. माग मोबाईल काढला आणि क्लिक व क्लिक करत गेलो. निसर्ग आणि झाडं झुडप डोंगर यांचे चित्रण केले. आपणासोबत शेअर कराव म्हणून येथे एल्बम टाकत आहे.

This slideshow requires JavaScript.

बाय बाय नाशिक

या वर्षी माझी बदली होणार आहे अशी चर्चा माझ्या कानापर्यंत आली आणि अस्वस्थता वाढली होती. मला नाशिक मध्ये राहून १४ वर्ष झाली आहेत. मागील ७ वर्षापासून नाशिकातील माझ्या कार्यालयाशी तेथील कामाशी प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे. ती आता नाहीशी होणार या कल्पनेने मन कासावीस होत होते. अचानक एके दिवशी एक फोन आला आणि माझी पुण्याला बदली झाली असे समजले. क्षणभरासाठी श्वास जगाच्या जागी थांबल्यासारखे झाले. शासकीय दौऱ्यावर होतो, लगेच फोन फोनी करून तपास केला बातमी खरी होती. मग मनाला समजावले आणि ते शांत झाले. अस्वस्थता कमी झाली.

पण ज्याक्षणी या कार्यालयातून बदली झाली हे समजले त्या क्षणी मला एक विचित्र जाणीव झाली. त्या क्षणी माझ्या मनाचा या कार्यालयाशी संबंध तुटला असे वाटले, हे कार्यालय परके वाटू लागले. आणि हळूहळू मनाची ओढ नव्या कार्यालय कडे होत गेली. हे मन असेच असते का? मी खूप विचार केला. मुलीला सांगितले. एखाद्या मुलीचे लग्न जुळले कि ती परकी हून जाते तेव्हा तिच्या मनाची काय घालमेल होत असेल? तिला त्या क्षणी माहेर परके वाटत असेल का? आणि सासरची ओढ जाणवत असेल का? हे मी माझ्या अर्धांगिनीला विचारले. तिने हसून होकार दिला.

आणि तो दिवस उजाडला २३ जून २०१० रोजी मी पुणेकर झालो. पुण्याला नवीन कार्यालयात हजर झालो. नवीन कार्यालयातील स्टाफ खुपच आवडला. सहयोगी खूप चांगले आहेत. मदत करत असतात. सहकार्य करतात. ज्या दिवशी मी पुण्याला हजार झालो त्या दिवशी श्री सुरेश पेठे साहेब माझी आतुरतेने वाट पाहत होते. त्याच दिवशी आम्ही भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला.

प्रथम मी एकट्याने पुण्याला राहायचा निर्णय घेतला होता. पण हळू हळू मला जाणवायला लागले कि एकटे राहणे शक्य नाही. लॉज वर राहणे बाहेरचे  खाणे,  बाहेरचा चहा पिणे मला अवघड जायला लागले. इकडे मुलगी आणि सौ. एकटेच त्यामुळे माझे सर्व चित्त त्यांच्यात. दुसऱ्या- तिसऱ्या दिवसा पासून मनाची ओढ घराकडे व्हायची. अस्वस्थता वाढायला लागायची. आता मला जनावायाले लागले होते कि पक्षी रोज सायंकाळी घराकडे का वळतात? आता मला घराचा विरह काय असतो त्याची जाणीव व्हायला लागली होती. एकटे राहिल्याने सिगारेट वरील ताबा सुटला होता. आणि एका महिन्यात मला जीना चढायला त्रास जाणवायला लागला होता. घरच्यांशी सल्ला मसलत करून मग सर्वांनी पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्यय घेतला.

आणि मग सुरु झाली माझी धावपड. कॉलेज मध्ये प्रवेश, घराची शोधाशोध. अनेक लोकांना भेटणे. घर बघणे. प्रत्येक घरामध्ये काही न काही त्रूटी सापडायच्या. कोठे घर लहान, कोठे घर पसंद पडायचे तर वेस्टर्न कमोड असायचे. शेवटच्या दिवशी पौड रोडवर एक पसंतीचे घर मिळाले आणि लगेच घेऊन टाकले.

आता नाशकातून काही वर्षांसाठी का होईना बाहेर राहणार आहोत. पुढील बदली होईपर्यंत तरी. नाशकात स्वतःचे घर आहे त्यामुळे अधून मधून चक्कर असणारच.  पण आता या पुण्या नगरीला बाय बाय करायची वेळ आलेली आहे.

बाय बाय नाशिक…………..

तरुण पुणे

शेवटी तो दिवस उजाडला आणि मी पुण्याला हजार झालो. तारीख २३ जून २०१०. पुण्यात पाय ठेवला आणि जोरदार पाउस सुरु. खूप मोठ्या काळानंतर पुण्यात प्रवेश केला होता. म्हणून सर्व नवीनच वाटत होते. बाहेर मोठा मोठ्या इमारती दिसत होत्या. बघितले तर चाकण . आता चाकण पासूनच पुणे जवळ आले आहे याची चाहूल लागायला सुरुवात झाली. आणि नाशिक फाट्यापासून तर पुणेच. एके काळी खडकी वगैरे भाग मोकळा दिसायचा. गावासारखे वातावरण असायचे. आज ते शहर बनलेले दिसले. नाही असे म्हणणे योग्य होणार नाही. खडकी हे शहराच्या चादरी खाली झाकले गेले आहे. एकूण म्हणजे पुण्याची कायापालट झाली आहे. अप्रतिम रस्ते आहे. कोठे हि घाण दिसत नाही. सर्वत्र शिस्तबद्धता दिसून येते.

कायापालट झालेल्या ह्या नव्या युगाच्या जवान शहरामध्ये आपले जुने ऑफिस कोठे आहे शोधून काढले. राहायची व्यवस्था एका पुणेरी पण अतिशय सुंदर स्वतः आणि मस्त लॉजमध्ये झाली मासिक तत्वावरच. मयूर कालोनी हा खुपच सुंदर परीसर वाटला. बघता क्षणी  मनामध्ये भरला. सकाळी आंघोळ आटोपून बाहेर फिरायला निघालो समोरच कर्वे रोड वर पेशवेकालीन शंकराचे पाषाणाचे देऊळ आहे.  तेथे झाडच झाड आहे. वातावरण प्रसन्न वाटते. देऊळात गेलो नमस्कार केला आणि बसलो ओंकार करीत. मग थोडा वेळा समाधिस्त झालो. वेळ कसा गेला कळलेच नाही. मन प्रसन्न झाले.

एक मात्र मला प्रकर्षाने जाणवले कि पुणे जे एके काळी पेंशनाराचे शहर म्हणून ओळखले जायचे ते आता तरुणांचे शहर बनले आहे. त्यापेक्षा असे म्हटले कि पुणे आता तरुण झाले आहे तर जास्त योग्य होईल. कारण जिकडे तिकडे तरुण मुल मुलीच दिसतात. शिक्षणाचे माहेर घर असल्याने जास्तीत जास्त तरुण  शिक्षणासाठी येतात. आय टी चे मोठे क्षेत्र असल्याने ही तरुण येतात( कारण ते क्षेत्र फक्त तरुणांसाठीच आहे असे वाटते.)

सांगायचा तात्पर्य असा कि पुणे तरुण झाले आहे व ते चिरतरुण राहो.

मला  मनापासून आवडले आहे  हे पुणे शहर.

मी पुणेकर होतोय!

चिमणी पाखर काही दिवस एका झाडावर घरट करुन राहतात. तेथील दानापाणी संपल की ते आपल गर सोडुन जेथे दानापाणी मिळेल तेथे जाऊन राहतात. पण नौकरदारांच अस नसत. नौकरी म्हटली की बदली ही आलीच. एकाच ठिकाणी जास्त वेळ रहाता येत नाही. माझे ही तेच झाले आहे. कालच कळले की माझी बदली पुण्याला झाली आहे. मी आनंदित झालो. पुण्यासारख्या शहरामधे रहाणे म्हनजे मागच्या जन्मी आपण काही तरी पुण्य केले असावे असेच आहे. नावाजलेले शहर आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणुन ही ख्याति प्राप्त झाली आहे ह्या शहराला.

१३ मे १९८५ रोजी मी खाजगी कंपनी सोडुन सरकारी कार्यालयात रुजु झालो. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असल्याने पाट्बंधारे खात्यात जल विद्युत शाखेत नौकरी मिळाली. राजपत्रित अधिकारी म्हणुन नौकरी असल्याने अत्यानंद झाला. लहाणपणी मी जेव्हा अभियंत्यांकडॆ अटेस्टेशन करायला जात होतो तेव्हा मला त्यांचा हेवा वाटत होता. आज आपण राजपत्रीत अधिकारी होत अस्ल्याचा आनंद मिळत होता. म्हणुन लगेच नौकरी पकडली.

नौकरीला लागलो ते डिजाईन चे ओफ़िस होते. सुरुवात डिजाईन इंजिनिअर म्हणुनच झाली. मुळात पिंड काम करण्याचा. लहाणपणापासुनच कामे करुन घराला् हातभार लावला होता. खरे सांगायचे तर इंजिनिअरिंग सुध्दा ट्युशन करुन, कंपनीत नौकरी करुन पुर्ण केले होते. तोच कामाचा पिंड सुरु ठेवला. आज ही आहेच. याचा फायदा असा झाला की कामामध्ये कधीच अडचण आली नाही. कसे ही आणि किती ही कठीण काम असले तरी ते करू शकतो असे मला वाटते.

मुंबईचे आकर्षण कोणाला नसते. मला ही होतेच म्हणून पहिल्या प्रथम मुंबईमधील कार्यालातच नौकरी मिळाली. तेथूनच सुरुवात झाली. १९८५ ते २००३ मुंबईमध्ये कार्यरत होतो. नंतर नाशिक येथे बदली झाली. काम पूर्णतया वेगळे होते. तरीही successfully पार पडले.  आज सकाळीच मी नाशिक येथून सुटलो. २३ जून रोजी पुणे येथील कार्यालयात हजार व्हायचे आहे. तेथे सुध्दा चेलेन्जिंग जोब आहे असे आज मला एक सहकारी बोलून गेला. मनाची तयारी आहेच. मुंबई जसे आवडत होते तसे पुणे सुध्दा आवडीचे शहर आहे. त्यामुळे आता पुण्याला जायचे वेध लागले आहेत. नवीन कार्यालय असेल. नवीन सहपाठी असतील.

राहायची व्यवस्था अद्याप झालेली नाही. ती करावी लागेल. कसे होईल देव जाणे. असो देव आपल्या पाठीशी आहेच.

सरकता जिना

आपल्या गावाकडील मंडळींना सरकता जिना म्हणजे एक कौतुकास्पद गोष्ट वाटते. आहेच ती कौतुकास्पद. ज्यांनी कधी  जिना बघितला नसतो  त्यांना सरकता जिना म्हणजे कौतुकास्पद असणारच. आमच नाशिक म्हणजे काही खेड नाही. परंतु येथे नुकताच एक अवाढव्य मॉल सुरु झाला आहे. त्या मॉल मध्ये एक नव्हे तर दोन दोन सरकते जिने बसविले आहेत. तो मॉल सुरु झाल्यावर तेथे तो विशिष्ट प्रकारचा जिना बघायला नव्हे तर त्यावर चढून बघायला लोकांची गर्दी व्हायला  सुरुवात झाली. एके  दिवशी आमच्या सौ. यांनी सुद्धा त्या मॉलला भेट देण्याचा आग्रह धरला. आम्ही काही मोठी हस्ती नव्हे की तेथे कोणी आपले स्वागत करेल, पण आम्ही तिघे तेथे गेलो तर गेटवर असलेल्या मॉलच्या कर्मचाऱ्यांनी चक्क आमचे स्वागत केले. प्रथम मेन गेट वर आणि नंतर ज्या ज्या ठिकाणी आम्ही भेट दिली तेथे आमचे स्वागत केले. आईये सर. पधारीये सर.असे शब्द कानावर पडले आणि मला उगाचच मी फार मोठा माणूस असल्यागत वाटायला लागले. खर म्हणजे अवघडल्या सारखे होत होते. कारण असे स्वागत करून घेण्याची सवय नव्हती. मी मनो मनी जाम खुश होत होतो. पण मला विचार करणे भाग पडले की आमचे स्वागत का होत आहे. झाले असे की आम्ही मॉल उघडायच्या आधीच तेथे पोहोचलो होतो. अजून १५ मिनटे उघडायला आहेत असे वाच्मेण ने सांगितले आणि आम्ही जवळच असलेल्या देवीच्या मंदिराला भेट द्यायला गेलो. परत येईस्तोवर मॉल सुरु झाला होता. आम्ही दुसरे तिसरे कस्टमर असल्याने प्रत्येक गेट वर बिचार्या गेटमेन ने आमचे हसतमुखाने स्वागत केले होते. असो पण मन प्रफुल्लीत झाले होते.
माफ करा मी आपला  मूळ उद्देश “सरकता जिना” सोडून दुसरीकडे भटकायला गेलो. तर आम्ही मॉल मध्ये एन्ट्री केली आणि पहिल्या माळ्यावरील शॉप मध्ये जाण्यासाठी सरकत्या जिन्यावर चढायला गेलो. तर सौ. ने माघार घेतली. हे बघून तेथील एक स्त्री वाच्मेण जवळ आली आणि मी तुम्हाला वर घेऊन जाते मेडम अशी म्हणाली. मी म्हणालो नको सध्या वर जायचे नाही. 🙂 अजून वेळ आहे त्याला. ती हसली आणि तसे नाही सर म्हणून थोडी लाजली. आम्ही खूप प्रयत्न केले पण सौ. यांची हिम्मत झाली नाही त्या जिन्यावर चढायची. तितक्या वेळात बरीच शी मंडळी ज्यात काही गरिबांचा समावेश होता येऊन त्या जिन्यावर चढून वर गेली. ज्यांना भीती वाटत होती ते गेलेच नाही.पण तेथे साधा जिना दिसून आला नाही त्यमुळे आता वर कसे जावे हा विचार करू लागलो तर त्या स्त्रीने सांगितले जिना नाही पण लिफ्ट आहे. मग आमची सावरी लिफ्टकडे सरकली. मुलगी मात्र त्या जिन्याने वर गेली होती. तिला तेहेच उभे राहायला सांगितले आणि आम्ही लिफ्ट कडे गेलो. तेथे सुद्धा तिला थोडी भीती वाटली पण गेलो वर पोहोचलो. हा प्रसंग ते जिन्या जवळचे चित्र पाहून खूप मजा येते असे वाटते येथेच उभे राहून लोकांची गम्मत पहावी.
ह्या सरकत्या जिन्यावरून मला मी जपानला गेलो होतो तेथील एक प्रसंग आठवला. त्या काळी मुंबई मध्ये सुद्धा असे सरकते जिने नव्हते. त्यामुळे मी कधी त्यावर चढलो नव्हतो. प्रथम आम्ही सिंगापूरला उतरलो होतो.  तेथे तर रेल गाडी सारखा एक पट्टाच होता. त्यावर उभे राहायचे तो आपल्याला पुढे सरकवत नेतो.म्हणजे सरळ चालायची सुद्धा गरज वाटत नाही. मात्र  आपल्याला ९० वर्षाचे झाल्यासारखे वाटते. 🙂 जपान ला असे सरकते जिने जवळ जवळ प्रत्येक रेल्वे स्टेशन वर आहेत. आश्चर्य म्हणजे तेथे जमिनी खाली पाच माले खाली रेल्वे लाईन आहेत. जमिनीखाली इतके खोलवर जायचे म्हटल्यावर असे वाटते जसे आपण पातळ लोकांमध्ये आलो आहोत. अशा सर्व स्टेशनवर सरकते जिने आहेत. आम्हाला त्यावर चढून जाण्याचा अनुभव नसल्याने खूप मजा आली होती. प्रथम पाय सरकवत पुढे न्यायचा त्या सरकणाऱ्या पायऱ्यांना स्पर्श करून पाहायचा व लगेच परत ओढून घ्यायचा. असे दोन तीन वेळा करून पाहिले. मग हिम्मत करून पाय ठेवलाच. आणि बेलेंस गेला. पडता पडता वाचलो रे बाबा. कसे तरी सावरले स्वतःला सावरले. पण पहिल्यांदा रिकाम्या हाती चढून पहिले होते. खरी गम्मत ती पुढे आहे. आता खाली कसे उतरायचे उतरतांना सुद्धा कसरतच  करावी लागली. एकदाचा खाली उतरलो. आणो आता सोबत आणलेल्या तीन तीन बेगा घेऊन कसे चढावे हा प्रश्न पडला. माझ्या कडच्या तीन व सोबत्यांच्या चार अशा सात बेगा आमच्या कडे होत्या जीण्यावरचा प्रवास करायचा अनुभव कोणालाच नसल्याने काळजी पडली होती. एका सोबत्याने एक बेग हातात घेऊन चढायचा प्रयत्न केला तर बेलेंस गेल्यामुळे तो सुद्धा पडता पडता वाचला. मग मी शक्कल लढविली. त्यांच्यातील  एकाला वर जाणून उभे राहायला सांगितले. तो वर चढला अर्थात त्या सरकत्या जिन्यानेच. मग मी त्याच सरकत्या जिन्यावर एक-एक बेग ठेऊ लागलो. ती बेग वर गेली कि तो उचलून बाजूला ठेवत असे. असे करून सर्व बेगा वर चढवल्या. आमची हि गम्मत लोकांना इतकी आवडली कि पाहणारांची गर्दी जमा झाली. ते जोर जोराने हसू लागले. असा हा सरकता जिना.

जपान मध्ये या सरकत्या जिन्यावर झालेल्या अपघाताचा यु ट्यूब वर सापडलेला हा व्हीडीओ  पहा.