बचत म्हणजेच उत्पादन

मित्रांनो, “वीजेची बचत म्हणजे वीजेचे उत्पादन” हे बोर्डाचे ब्रिदवाक्य आपण ऐकले असेलच.

वीजेसाठीच कशाला, प्रत्येक बाबीसाठी हा मंत्र लागू पडतो. जसे शरीरातील ताकद. आपण विनाकारण ताकद संपवली तर जेव्हा शरीराला खरोखर ताकदीची गरज असते तेव्हा शरीरात ताकद नसते. आणि अचानक ती उत्पन्न ही करता येत नाही. म्हणून एनर्जी ची बचत करणे म्हणजे च उत्पादन करणे असे होत नाही का??

तसेच पैसा उपलब्ध असतो तेव्हा आपण विनाकारण खर्च करतो. जेव्हा आपल्याला खरोखर त्याची गरज असते तेव्हा तो उपलब्ध नसतो. तेव्हा आपण पश्चाताप करतो कि पैसा होता तेव्हा काटकसरीने खर्च केला असता तर आता कामी आला असता.

मित्रांनो, पाण्याचे ही तसेच आहे. पावसाळ्यात जेव्हा मुबलक पाणी

उपलब्ध असते आपण बचत न करता मोठ्या प्रमाणात खर्ची घालतो. आणि उन्हाळ्यात जेव्हा खरोखर पाण्याची गरज असते आपण तेव्हा पाण्यासाठी वणवण भटकतो पण ते मिळत नाही.

म्हणून योग्य वेळी बचत करणे महत्त्वाचे असते.

Advertisements

भाकरी…

काय राव, हल्ली भाकरी म्हणजे स्वप्नवत वाटते. ६०-७० च्या दशकात दररोज प्रत्येक घरात भाकरच बनत असे. गहु तर गरिबांना दुर्मिळ होते. आमच्या घरी ही दर रोज ज्वारी ची भाकरच मिळे.

पोळी फक्त दिवाळी, दसरा, होळी असे मोठे सण असले तरच. किती आनंद व्हायचा जेव्हा घरात गोळी व्हायची. होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत होळी साजरी व्हायची.

आम्ही खूप आनंद लुटत असु जीवनाचा.

बर, त्याकाळी घरोघरी गुळाचा चहा असायचा. मात्र घरी जर पाहुणे आले तर गुपचूप दुकानात जाऊन साखर आणायचे जेणेकरुन पाहुण्यांना हे समजू नये की यांच्या घरी साखर सुद्धा नाही.

अर्थात आलेला पाहूणा सुद्धा श्रीमंत नसायचा. त्याच्या घरी सुद्धा साखर आणायची हीच पद्धत असायची. पण आपण श्रीमंत आहोत हे दाखविण्याचे एक साधन साखर सुद्धा होते हे आपल्या लक्षात आले असेलच.

साखरेचा चहा फक्त पाहुण्यांनाच बर का.

आम्हाला तर चुकुन ही नाही. मुलं आग्रह ही करत नसत. मुलं सुद्धा परिस्थितीची जाण ठेऊनच वागत.

या सर्वांचं कारण म्हणजे घरोघरी गरिबी होती असे आहे का? तर माझ्या मते तसे नाही. कारण गुळ जास्त प्रमाणात उत्पादित व्हायचा आणि साखर कमी. म्हणून गुळ स्वस्त होता.

तसेच भाकरीचे ही होते. ज्वारीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जात होते. म्हणून ज्वारी स्वस्त होती.

हळूहळू जग बदलत गेल. हे तर फक्त म्हटले जाते. खरे म्हणजे बदलत आपण जात असतो नाव मात्र जगाच घेतो. आपल्याला वाटत जग म्हणजे इतर लोकं. आपण याच जगात राहतो, याच जगाचा हिस्सा आहोत हे आपण विसरतो. बर असो. आपण आपल्या मुळ मुद्द्यावर परत येऊ.

हो तर कालांतराने गुळ आणि ज्वारी महाग झाले आणि साखर व गहु स्वस्त. गरिबांना आता साखर व गहु

खाणे परवडायला लागले.

मग काय. घरोघरी साखरेचा चहा. आपणच आपल्या घरी पाहुणे झाल्यासारखे वाटायला लागले. कालांतराने आपली मानसिकता ही बदलली व दररोज साखरेचा चहा आणि गव्हाची पोळी खाणे अंगवळणी पडले.

पण जीवनाचा तो आनंदच हिरावला गेला आहे की राव.

“जो मजा उस जीने मे था जॉनी वो अब कहाँ??”

आता साखरेचा चहा दिवसातून किती दा ही घेतला तरी कोणी रागवणार नाही. गव्हाची पोळी ही रोजच्या जेवणाचा अंग झाली आहे.

चलचित्र …..२

तंत्रज्ञानाचा जितक्या गतीने विस्तार झाला तितक्याच गतीने आपण त्याला विसरत ही गेलो.

दररोज नवनवीन मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहेत. काल जो मोबाईल आपल्याकडे होता, तो आज चालवायला होत नाही. जितक्या गतीने तंत्रज्ञानात बदल होत आहे तितक्याच गतीने आपली बुद्धी विसरत जाते. आपल्या मागच्या मोबाईल बद्दल आपण सर्व विसरून जातो.

मला ३० वर्ष्यापूर्वीचा कार्यालयाचा फोन नंबर आठवतो पण आताचे नंबर पाठ होत नाही. कारण आपल्या सुप्त बुद्धी ला ही कळते मोबाईल हातात आहे मग पाठ का करावे? लहान पणी पाठ केलेले पाढे पाठ आहेत अजून ही. आताच्या विद्यार्थ्यांना पाढे जमत नाहीत.

तंत्रज्ञानाने नवीन जग पहायला मिळते पण खर जग आपण विसरून जातो. आपण व्हर्च्युअल जगात जगतो आहोत.

झाडे…२

माझ्या मनाच्या कविता..।

https://manachyakavita.wordpress.com/2019/05/17/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a5%a8/

पाण्याचा गोळा………

मित्रांनो आज जगात पाणी प्लास्टिक बाटलीत भरून विकल जात आहे. त्यामुळे तहान भागते पण एक वेगळा भयानक प्रश्न जगासमोर येऊन उभा राहिला आहे. रिकाम्या बाटल्यांच काय? त्यामुळे प्रदूषण प्रचंड वाढतय! व्हाट्स अप कोणी तरी हा व्हिडिओ शेअर केला. मला आवडला. पण याबद्दल खात्री केलेली नाही. 

पण मला वाटते कि पाणी . पिल्यावर बाटल्या जमा करण्यासाठी मोठ्या डस्ट बिन ठेवल्या व त्या बाटल्यांचे रिसायकलिंग करून वापर केला तर? किंवा त्याच कंपन्यांनी त्या बाटल्या घेऊन स्टरलाईज करून पुन्हा वापरल्या तर चालेल का? 

दुसर मत वाचून  जरा किळस वाटतो.

असो आपल मत नोंदवा जरूर

टी.व्ही.गुंडाळून ठेवा बर!!!

साधारण एक  दोन वर्षापूर्वी माझ्या मनात सहज येऊन गेले होते कि भविष्यातील टी.व्ही. एका पडद्या सारखा असेल . पाहिजे तेव्हा गुंडाळून ठेवायचा आणि उघडला कि बघायचा. याबद्दल माझ्यामनात असे हि आले होते कि आपल्या देश्यातल्या टी.व्ही. बनविणाऱ्या मोठ्या कंपनीला हि कल्पना सुचवायची. तशी मी सुरुवात हि केली होती. पण जीवन इतके व्यस्त आहे कि कुठलेच काम पूर्ण होत नाही. हि कल्पना मी मित्रांना आणि घरी मुलीला हि सांगितली होती. मला वाटते ब्लोग वर हि टाकली होती. आज लोकसत्तेमध्ये एक बातमी वाचली आणि कल्पना पुन: जागृत झाली. जपान मध्ये एका कंपनीने असा टी.व्ही. तयार केला आहे. Screenshot_1

अमुल्यतेचे मूल्य

जेव्हा पासून जगात आय टी क्षेत्राचा जन्म झाला आहे. रुपयांचे मूल्य अधोगतीला चालले आहे. सध्या कोटी रुपये म्हणजे काहीच नाही. आजच एक बातमी वाचण्यात आली गुगल आणि याहू यांच्या चढाओढीत याहू ने बाजी मारली आणि गुगल कडील एका अधिकाऱ्याला वर्षाला चक्क ५ कोटी ८० लक्ष डॉलर पगार देऊ केला. यांचे रुपये किती हे करायच्या विचारानेच मला धडकी  भरली. आजचे एक डॉलरचे मूल्य ५२.६०  रु. असे होते. ह्या दराने ह्या माणसाचा वर्षाचा पगार काढणे अवघड वाटते. पण एक लक्ष डॉलर म्हणजे ५२.६३ लक्ष रु. ५८० लक्ष रु. म्हणजे ३०५०८ लक्ष रु. म्हणजे वर्षाचा एका माणसाचा पगार ३०५.०८ कोटी रु.  एका महिन्याचा पगार २५.४२ कोटी आणि रोजचा पगार ८४ लक्ष रु. बाप रे. मला वाटते मी हजारो वर्ष जगलो किंवा हजारो जन्म घेतले तरी इतका पगार मिळविणे मला शक्य नाही.

आजच दुसरी एक बातमी वाचली की सिटी ग्रुप ला मागील तिमाहीच्या जवळ जवळ ८८% कमी नफा  झाल्याने विक्रम पंडित यांनी राजीनामा दिला.

किती विरोधाभास वाटतो नाही ह्या दोन बातम्यांमध्ये. हे जगात काय चालले आहे? कोणी सांगेल का? कोटी पेक्षा कमीचे शब्द कोणाच्या ही तोंडून निघत नसल्याने कोटी ह्या शब्दाचे मूल्यच कमी झाले आहे.