आरोग्य….

मित्रांनो, आज २९ सेप्टेंबर. आजचा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मागच्या दोन-तीन दशकात तंत्रज्ञानाची खूपच प्रगती झालेली आहे. विशेष करून डिजिटल क्षेत्रात तर खूपच. पण डिजिटल हे कागदावर असत. त्यासाठी मशिन ही लागतेच. मशिन असेल तरच डिजिटल चा उपयोग होतो. असे म्हणणे योग्य होईल कि मशिन चालविण्यासाठी डिजिटल चा उपयोग केला जातो. आणि मशिन अभियंता तयार करतो.

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त वर्तमान पत्रात एक लेख आला आहे. तो मी येथे शेअर केला आहे. त्यावरून मला ही पोस्ट लिहावीशी वाटली. सध्या इतकी प्रगती झाली आहे कि तुमचं ह्रदय स्मार्ट फोनशी जोडलं जात आहे. आणि स्मार्ट फोन तुमच्या डॉक्टरांशी जोडला जातो आहे. तुमच्या ह्रुदयात काही ही गडबड जाणवली कि स्मार्ट फोनवर त्याची क्षणार्धात नोंद होऊन संबंधित डॉक्टरांना संदेश पोहोचतो. आणि लागलीच तुमच्याशी डॉक्टर फोनवरून संपर्क साधतात. मार्गदर्शन करतात आणि जवळच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून योग्य उपचार देतात. म्हणजे तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जरी असला तरीही असहाय नसणार. लगेचच तुम्हाला आरोग्य मदत उपलब्ध होऊन तुमचे प्राण वाचू शकतात. किती ही प्रगती. मला वाटते सन २००० नंतर जग झपाट्याने बदलत गेले. अर्थात तंत्रज्ञानाच्या बाबतीत. जास्त माहिती साठी सोबतचा लेख वाचा. असो जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा👍👍

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🙏शुभ सकाळ🙏 अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही,आणि माणूसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही.
लाख नाही कमावलेत तरी चालेल ,पण लाखमोलाची माणसं कमवा आणि आयुष्यभर टिकवा…
आयुष्य कितीही सुंदर
असले तरी आपल्या
माणसां शिवाय अपूर्ण
आहे… 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्राणवायू…।

ब्रम्हांडात अजून तरी माहिती नाही, पण कदाचित संपूर्ण धरणीवर जगण्यासाठी जी पंचमहाभूते आवश्यक आहेत त्यातील वायु ही एक आहे. प्राणवायू अर्थात ऑक्सिजन हा त्याच वायुमंडलातील एक घटक असून तो ऑक्सिजन शिवाय कुठल्याही जिवंत मानव अगर प्राण्याला जगणे अशक्य आहे. ज्याने या ब्रम्हांडाची परिपूर्ण विचार करून निर्मिती केली त्या अद्रुष्य शक्ती ला दंडवत प्रणाम.

जेव्हा पासून हे ब्रम्हांड अस्तित्वात आले आहे तेव्हा पासून ही पंचमहाभूते व पर्यायाने ऑक्सिजन अस्तित्वात आहे. पण असा गैसचे ब्रम्हांडात अस्तित्व शोधून काढले ते प्रथम सन १७७२ मध्ये कार्ल शैले या वैज्ञानिकांनी. परंतु त्यांचा लेख १७७७ पर्यंत अप्रकाशित राहिला. दरम्यान सन १७७४ मध्ये जोसेफ प्रिसले यांनी मरक्युरी ऑक्साईड गरम करून ऑक्सिजन तयार केली.

कदाचित तेव्हा या दोन्ही महानुभावांना ऑक्सिजन हा प्राणवायू असून जगण्यासाठी अत्यावश्यक आहे हे माहीत ही नसेल. विशेष म्हणजे या दोन्ही पैकी कोणीही या वायुचे ऑक्सिजन हे नामकरण केलेले नाही. हे काम केले आहे एंटोनी लैवोइजियर यांनी.

तत्पूर्वी कुठल्याही वस्तुला जळण्यासाठी एक बाहेरील घटक आवश्यक असतो असे बऱ्याच वैज्ञानिकांनी शोधून काढले होते पण परिपूर्ण माहिती नव्हती. शाळेत हे आपण शिकलो होतो पण आता लक्षात नाही.

हल्ली टिव्हीवर ऑक्सिजन वर रणकंदन सुरू असल्याने गुगल बाबांना माहिती विचारली तर ऑक्सिजनचा इतिहास अत्यंत रोचक आहे असे दिसले. असो.

मित्रांनो, ह्या कोरोनाने संपूर्ण जगाला ( चीन वगळून) वर्षभरापासून ऑक्सिजनवर ठेवले आहे. प्रत्येक मनुष्य धाकात जगत असेल; अर्थात ही माझी समज असावी कारण हे खरे असते तर लोकांना मास्क वापरायचे कायदे करून ही परत परत सांगावे लागले नसते. मास्क लावल्याने ऑक्सिजन कमी पडून गुदमरते म्हणून तो मास्क खाली गळ्यात केला जातो असे कारण सांगतात. हे काही प्रमाणात खरे ही आहे. पण आतापावेतो सवय व्हायला हवी होती. एक माझा अनुभव आहे की मानसिकता तयार केली तर दिवसभर जरी मास्क राहिला तरी त्रास जाणवणार नाही. सुरुवातीला मला ही गुदमरल्या सारखे व्हायचे. आता काही ही त्रास होत नाही. दोन तीन तास बाहेर राहिलो तरी काही वाटत नाही.

पण बाबांनो, असे मास्क लावून गुदमरणे सहन केलेले योग्य कि कोरोनाने कायमस्वरूपी गुदमरून मेलेले योग्य? आता हे तुम्हीच ठरवा . हे मी नव्हे तो यमराज म्हणत असेल हो.

अहो, बातम्या बघा. देशभरातून ऑक्सिजन की कमतरता असल्याच्या बातम्या येत आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण विनाकारण घराबाहेर पडू नये.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं. प्रसंग उदभवल्यावर आपण काहीच करु शकत नाही याचे भान ठेवा.

आता प्रत्येकाला निसर्गाने दिलेल्या बहुमुल्य वायुचे महत्त्व कळत असावे. म्हणून तर जो तो ऑक्सिजन सिलेंडर विकत घेऊन घरात ठेवत आहे. कदाचित मला काही झाले तर? अशा भिती ने सर्व घाबरत आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. हे भविष्य काळासाठी चांगले संकेत नाहीत मित्रांनो.

दोन तीन दिवसांपूर्वी बातमी वाचली होती की डॉक्टर म्हणतात आम्हाला प्रश्न पडतो म्हाताऱ्या रुग्णांना वाचवायचे कि तरुण रुग्णांना?

अशावेळी तरुण रुग्णांना वाचविणे महत्त्वाचे असते. त्यांना प्राधान्न्य दिले जाते. जे योग्य ही आहे.

म्हणून म्हणतो मित्रांनो, शक्य तोवर घरीच थांबलेले बरे. खूपच गरज असेल तरच बाहेर पडले पाहिजे. विनाकारण रस्त्यावर गर्दी करु नये.

घरीच रहा सुरक्षित रहा.

झाडे लावा झाडे जगवा

(03321849)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं…किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती आणले, हे जास्त महत्त्वाचं…
काळजी घ्या, सुरक्षित रहा….
——————————————————-
💐 शुभ सकाळ 💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

http://www.Ownpoems.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रकृतिचा आलेख

मित्रांनो, आपण जन्मतो तेव्हा सुरुवातीचा काही काही काळ फार मोठ्या रिस्कचा असतो. प्रतिकार शक्ति कमी असते. त्यामुळे रिस्क फार मोठी असते. म्हणून लहान मुलांना फार जपावे लागते. जर इंफेक्शन झाले तर फार कठीण होते.

जसजसे वय वाढत जाते ही रिस्क कमी कमी होत जाते. कारण प्रतिकार शक्ती वाढत जाते. आपल शरीर वातावरणाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत करत सेटल झालेले असते.

(लहान मुलांच्या प्रकृतिचा आलेख)

हे वय असते २० ते सुमारे ३५. तसे काही लोकांच्या बाबतीत ४०-४५पण चालते. परंतु ४५ नंतर शरीराची प्रतिकार शक्ती कमी होत जाते. जेव्हा प्रतिकार शक्ती कमी व्हायला सुरुवात होते तेव्हा आरोग्याची रिस्क वाढत जाते. जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा तर ही रिस्क अगदी टोकावर असते. साठी नंतर बहुतेक लोकं म्हणत असतात. आता यापुढील आयुष्य हे बोनस आहे. कोणत्याही क्षणी बोलावले जाऊ शकते.

काही लोकं जे बोटावर मोजण्यासारखी असतात, ९० ही पार करतात. मला वाटते डॉ. श्रीराम लागू हे ९२ व्या वर्षी गेले.

पण जितके जास्त वय तितके त्रास जास्त. योग्य वेळी देवानं बोलावलं तर बर असतं बुआ.

(19659)

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल तर जरा विचार करून पहा नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर
दिसेल.

💞💞 💞💞शुभ सकाळ💞💞💞💞

✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

http://www.ravindra1659.wordpress.com

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मल्टिपरपज् मास्क…(19542)

शहरात फिरतांना जर एखाद्या घाणेरड्या जागे जवळून आपण गेलो तर नाकाला रुमाल गुंडाळून जातो किंवा कपड्याने नाक घट्ट धरून तरी पुढे निघून जातो. ते का? तर मुख्य कारण असते तो घाणेरडा वास किंवा दुर्गंधी. दुसरे कारण असते त्या घाणी मधील किटाणू आपल्या शरीरात प्रवेश करु नये.म्हणजे या दोन कारणांपासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण तोंडाला कपडा किंवा रूमाल बांधतो. हे सर्वसामान्य मानसाचे झाले. पण थोडे मोठे म्हणजे सम्रुद्ध लोकांचे झाले तर ते कपडा/ रुमाल वापरणे योग्य वाटत नाही म्हणून त्यांना मास्क वापरायला दिला जातो.

आता हे मास्क वापरण्याचे मुख्य कारण माझ्या मते आपले स्वतः चे घाणी पासून रक्षण करणे हे होय.

पण प्रदूषणापासून स्वतः च्या सूरक्षेसाठी सुद्धा हेच मास्क वापरता येते.

याचप्रकारे रूग्णालयात गेल्यावर आजारपणापासून आपल्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा हाच मास्क आपण वापरु शकतो. त्यामुळे तेथे प्रत्येकाच्या तोंडाला मास्क दिसायला हवा पण तसे दिसून येत नाही. कारण आपण तंदरुस्त असतो. आणि रुग्णांपैकी सुद्धा प्रत्येक रुग्ण असा नसतो ज्याला लगेच आजाराची लागण होईल. ज्याची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा रुग्णाला विषाणूपासून संरक्षण आवश्यक असते.

मास्क

तरी ही एक गोष्ट लक्षात येते की शल्य चिकित्सा कक्षेत (मित्रांनो, शुद्ध मराठी शब्द अर्थ लक्षात आला नसेल तर सांगतो, ऑपरेशन थिएटर) प्रवेश करतांना प्रत्येक व्यक्ती ला मास्क लावावा लागतो.

जेव्हा मला शल्यचिकित्सा कक्षेत घेऊन जात होते तेव्हा मला मास्क बांधण्यासाठी दिला आणि माझे विचारचक्र सुरू झाले.

ऑपरेटिंग थिएटरमध्ये प्रवेश करतांना का मास्क वापरला जात असावा. ऑपरेशन थिएटरमध्ये बाजूला वेटिंग रुममध्ये थिएटर रिकामे होण्यासाठी वाट पाहावी लागते. तरी त्या रुग्णालयात १५-२० तरी ऑपरेशन थिएटर असावेत असा मी कयास केला मला घेऊन जात असलेल्या थिएटर च्या नंबरवरून. कदाचित माझे चुकीचे ही असू शकते. पण आपला मुख्य मुद्दा “मास्क” हा आहे.

तर ऑपरेशन थिएटर मधे मास्क वापरण्याचे कारण अगदी विरुद्ध आहे असे मला दिसून आले. तेथे आपण आपल्या संरक्षणासाठी मास्क वापरत नसून तेथील वातावरण आपल्या शरीरातील विषाणूंनी प्रदुषित होऊ नये म्हणून मास्क वापरतो. तेथील अंतर्गत वातावरण कायम स्टर्लाइज केलेले असते त्यामुळे तेथे बाहेरून येणाऱ्या किटाणूंचा प्रादुर्भाव होण्यापासून संरक्षण आवश्यक असते.

तसेच रूग्णाच्या शरीरावर शस्त्रक्रिया केली जात असल्याने ते शरीर अर्थात शल्यचिकित्सा होत असलेला शरीराचा अंतर्गत भाग उघडला जात असतो तेव्हा त्याच्यावर बाह्य विषाणूंनी प्रभाव करु नये म्हणून.

तसेच ऑपरेशनच्या क्लिष्टतेनुसार मला वाटते व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवले जाते. तशा परिस्थितीत रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होत असावी म्हणून मास्क वापरला जात असावा. मला आत घेऊन गेले तेव्हा लावला होता टेबलवर काढून टाकला हे मला आठवते.मला व्हेंटिलेटर लावणार अशी कल्पना दिली होती डॉक्टरांनी.

MRI- स्वानुभव

MRI बद्दल बरच ऐकत आलो आहोत आपण पण प्रत्यक्ष अनुभव करणे वेगळे असते.

१०-११ वर्षापूर्वी माझा दुचाकी वरून पडल्याने अपघात झाला होता. डोक्यात रक्त साठल्याने डोक्याचा MRI काढला होता. पण मी बेशुद्ध असल्याने मला त्याचा अनुभव नाही.

पण ऑपरेशन होण्यापूर्वी माझ्या संपूर्ण शरिराचे MRI टेस्ट करण्यात आले.

एक महाकाय मशीन. संपूर्ण शरीर मशिन मध्ये घातले जाते. आंत मधे खुप अंधार असते म्हणून भिती वाटते. असे ऐकिवात होते. पण मी त्यावेळी निर्विकार झालो. त्यामुळे मला भिती वाटत नव्हती.

जेव्हा बेल्ट बांधून मला मशिन मधे ढकलण्यात आले तेव्हा मी डोळे घट्ट मिटून घेतले. मला सांगितलं गेलं कि मशिन मधून वेगवेगळे आवाज येतील. त्यासाठीच कानावर पॉड लावण्यात आले होते.

जेव्हा मशिन सुरु झाले तेव्हा असे वाटायला लागले जसे आपण प्रत्यक्ष युध्द भूमीवर आहोत. आपल्या अवतीभवती रणगाडे असून त्यातून तोफगोळे सोडले जात आहेत. धडपड धडपड असे ते आवाज. बाप रे.

जवळजवळ अर्धा तास टेस्ट सुरू होता. आणि युद्धावरुन परत आल्यासारखे वाटू लागले.

माऊथ फिडिंग..

मित्रांनो, काल सकाळी मी नोज फिडिंग ही पोस्ट टाकली होती. आजारपण ही वैयक्तिक बाब असल्याने बर्याच मित्रांना आवडली नसावी. पण मला आलेला दिव्य अनुभव मला मनापासून इतरांना सांगावासा वाटला म्हणून ती पोस्ट. यात कसली ही सहानुभूती मिळविण्याचा प्रश्न नाही.

असो पण आपल्या सर्वांच्या स्नेहाचे लागलीच परिणाम जाणवले. मी 11 वाजेला दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी लगेच सांगितले नाकातील नळी काढा. आता तोंडाने जेवण करा. त्याक्षणी माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

मी घरी आल्यावर लगेच पाणी पिण्याचा आनंद न उपभोगता थोडे थांबून कल्पनेत जगणे पसंत केले आणि अर्ध्या तासाने थोडसं पाणी तोंडाने पीलं. मित्रांनो, 25 जून रोजी रात्री 11 पासून तोंडाने घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला होता. आज जवळजवळ 1 महिना झाला.

नंतर सौ. ने मिक्सर मध्ये पोळी वरण आणि थोडी भाजी अर्थात तयार झालेले पेस्ट एक ग्लास भर होते. ते तोंडाने घेतल्यानंतर काय आनंद झाला असेल मित्रांनो, तो शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.

नोज फिडिंग…

मित्रांनो, शिर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल न! आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. आपण लहानपणी मला आठवते लाईट गेली कि अंधार व्हायचा आणि मग आई चिमणी लाव न लवकर असे आपण म्हणत असु. तेव्हा बाबा रागवून म्हणायचे खा कि अंधारात काही नाकात घास जाणार नाही.

अहो नोज फिडिंग शक्य तरी आहे का? पण आहे. मी कधी याची कल्पना ही केली नव्हती. पण आज मी स्वतः नोज फिडिंग अनुभवत आहे.( मित्रांनो माफ करा आजारपण हा खाजगी विषय आहे पण त्याचे कौतुक करणे मला योग्य वाटले म्हणून ही पोस्ट)

मित्रांनो, मध्यंतरी माझ्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. तोंडात शस्त्रक्रिया झाल्याने तोंडातुन जेवण करणे शक्य नाही. म्हणून नाकातून पोटात एक नळी टाकलेली आहे. त्यातून पातळ पदार्थ, चहा, दुध आणि पाणी “पुरवले” जाते. “भरवले” जाते असे म्हणणे योग्य होणार नसल्याने “पुरवले” शब्द वापरला आहे.

असो, हा आयुष्यातील एक वेगळाच अनुभव आहे.

गंमत म्हणजे आपण काय खालले याचा स्वादच समजत नाही. काही तरी पोटात गेल आणि पोट भरल असं वाटते. ढेकर ही येतातच.

यावरून एक मात्र समजले कि स्वाद हा फक्त आणि फक्त जीभेलाच कळतो. असे म्हणतात ही काय सटरफटर खातोय. जीभेचे चोचले पुरवतोय तो दुसरे काय??

कडू, गोड, तिखट, आंबट असा काही प्रश्न उदभवत नाही. पोटाला स्वादाचा प्रश्नच नाही. निसर्गाने त्याला हे नेमून दिलेले काम नाही. हे काम जीभेला नेमलेले असल्याने तिनेच ते करावयाचे असते.

निसर्गाने शरीरातील प्रत्येक अवयवाला जे काम नेमलेले आहे तेच काम तो अवयव करतो. यावरून हे सिद्ध होते कि दुसर्याच्या कामात कोणीही ढवळाढवळ करू नये.

हा एक वेगळा अनुभव सध्या मी घेत आहे.

आणखी एक सांगतो वैद्यकीय क्षेत्र प्रचंड प्रमाणात प्रगत झालेले आहे. त्यांचे ही कौतुक करावे तितके कमीच.

ती, ती, ती आणि मी….

मित्रांनो, अभियांत्रिकी चे दुसरे वर्ष सुरु असतांना एका मित्राचा प्रेम भंग झाला आणि तो वेड्यासारखा वागू लागला.काही काळाने त्यातून तो बाहेर पडला आणि शिक्षण सुरू ठेवले. पण त्याचा तो देवदासपणा काही केल्या जात नव्हता. मी मला वेळच कुठे होता हे प्रेम वेम चे वेड बाळगायला! सकाळी ७ वाजता स्वतः तयार केलेले पराठे चहा सोबत खाऊन जीवनाचा आनंद उपभोगुन कॉलेजला जायचे तेथून च पुढे शिकवणी ला जायचे. शिकवणी म्हणजे लहान मुलांना शिकवायला त्यांच्या घरी जायचे. संध्याकाळी घरी परत यायला ७-८ होणार. आल्यावर घरी स्वयंपाक करणे. अभ्यास मात्र रात्रीच.

अशा स्ट्रगल असलेल्या जीवनात प्रेमाचा दरवाजा असू शकतो का हो? विचार सुद्धा येत नाहीत.

अशा दुःखी माणसाला त्याने सोबत मागितल्यावर नकार देणे कसे शक्य आहे. माझे ही तसेच झाले. तो मला सोबत घेऊन गेला. कोठे बर नेले असेल त्याने? दुसरे कोठे?

तिच्या घरासमोर तिच्या दर्शनासाठी लांब बसून प्रतिक्षा करण्यासाठी. त्याला सोबत म्हणून मी बसून राहावे.

आणि बस तोच हा चुकीचा निर्णय ठरला माझ्या आयुष्यातला. तो वेळ घालविण्यासाठी सिगारेट ओढायचा. मला त्याने आग्रह केला. मी नकार देत देत थोडा वेळ घालवून नेला पण स्वतः ला थांबवू शकलो नाही. शेवटी एक दम लावून बघीतला आणि प्रचंड त्रास झाला.

मग दुसरा, तिसरा करत सुरू झाली आणि त्या अनामिकेने माझ्या सुस्थितीत सुरु असलेल्या जीवनात अनाहूतपणे प्रवेश मिळविला.

या प्रवेशाला आज जवळजवळ ४० वर्षे झालीत. तिच्या त्या अनाहूत प्रवेशाचे दुष्परिणाम आता या म्हातारपणी दिसून आले आहेत.

अस म्हणतात न कि पहिले प्रेम हे मनुष्य कधीच विसरत नाही. माझे ही तसेच झाले. सिगारेट च्या प्रेमात पडलो आणि तिचाच होऊन बसलो.

लग्न झाले आणि दुसरी “ती” आयुष्यात आली. तिने खुप प्रयत्न करून पाहिले पहिल्या तिला माझ्या आयुष्यातून घालविण्याचे. पण तिला ते शक्य झाले नाही.

जीवन असेच सुरू राहिले. पुढे आयुष्यात मुलगी (हिच ती तिसरी “ती”)आली. तेव्हा एक मात्र ठरविले. मुलगी सोबत असेल तेव्हा सिगारेट टाळावी. तसे झाले ही. मुलगी मोठी झाली. आता तिला कळायला लागले. पत्नी ने मुलीच्या मदतीने दबाव टाकायचा प्रयत्न केला सिगारेट सोडवायचा पण बिचारी ती ही थकली.

१५जून २०१९. लग्नाचा ३३वा वाढदिवस. संध्याकाळी डॉक्टरांच्या क्लिनिकमधून फोन आला. तुमचे टेस्ट रिपोर्ट आले आहेत. मी गेलो. मनात देवाचा धावा करत करत डॉ. साहेबांना भेटलो आणि ……….

आयुष्याला एक कलाटणी मिळाली. ४० वर्षांपासून करित आलेल्या एंजॉय मेंट चे हे परिणाम आहे मित्रा असे माझा मी च मला बोलून गेलो. पण बायको आणि मुलीचे काय? त्यांची यात काय चुक? त्यांनी का आपल्यामुळे हे सहन कराव?

लोच्या झाला रे….

मित्रांनो, ईश्वराने आपल्याला जे नश्वर शरीर दिलेले आहे ते नश्वर म्हणजे नाशवंत असल्याने क्षणोक्षणी त्यात केमिकल लोचा होत असतो. जुन्या कोशिका मरतात आणि नवीन तयार होतात. याशिवाय काही आजार उदभवतात व औषधोपचार केल्याने निघून पण जातात.

एकूण सांगायचा तात्पर्य असा कि क्षणोक्षणी शरीरात लहान मोठा केमिकल लोच्या होत असतोच.

लहान असेल आपण दुर्लक्ष करतो. आपण दुर्लक्ष केले तरी शरीर दुर्लक्ष करत नाही. ते स्वतः प्रतिकार शक्ती तयार करून घेते व त्या आजारापासून शरीराला मुक्त करते.

पण काही दुर्धर आजार असतात जे इतके निर्लज्ज असतात कि शरीर त्यांच्या पुढे थकते व शरीराची प्रतिकार शक्ती तयार करण्याची ताकद संपते. अशा वेळी नाईलाजाने आपल्याला डॉक्टर साहेबांना भेटून पुढील वाटचाल करावीच लागते.

तुम्ही म्हणणार पुढील वाटचाल म्हणजे काय हो??😊

म्हणजे नेमका काय इलाज करावा, कुठे करावा, शस्त्रक्रिया करावी का?? ई.ई.

म्हणजे जेव्हा ईलाज करू शकत नाही तेव्हा बाहेरील ईलाज करावा लागतोच.

पण हा मोठा केमिकल लोचा नाकीनऊ आणतो. काही वेळा तो इतका भयावह असतो की आपल्याला उद्याची ही शाश्वती नसते. हा केमिकल “लोचा” आपल्याला “आता चालो नी बाबा” असे म्हणायला आला आहे की काय अशी धास्ती मनात वाटत असते.

आणि तो विशिष्ट काळ काळच असतो. त्यातून मार्गक्रमण करत असताना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.

आणि अशा प्रसंगातून प्रवास केल्यास प्रचंड प्रमाणात प्रतिकार शक्ती प्राप्त होते व आपण प्रत्येक कठीण प्रसंगाला तोंड देत जीवनात सुसह्य मार्गक्रमण करतो.

मी एक रुग्ण

आज सकाळी उठलो आणि बघितले तर कन्या काम्पुटर वर बसून अभ्यास करीत होती. मी अकबर बिरबलच्या गोष्टी सारखे काय करते आहे असे विचारल्यावर उत्तर,”……….”. मी समजलो स्वारी अभ्यासात मग्न आहे. म्हणून disturb न करता स्वतः काम्पुटर वर बघितले तिने डाउनलोड केलेले एक text book उघडून notes बनविण्याचे सुरु होते. मी निमुटपणे माझ्या दिनक्रीयेला लागलो. सर्व आटोपून झाले तरीही ती काही उठली नाही.३ तास झाले होते तरी ती तेथेच.मी मनातल्या मनात तिच्या उठण्याची वाट बघत होतो. पण काही उपयोग नाही मनात येत होते आता आणखी एक काम्पुटर घेऊन टाकावा. मला रोजप्रमाणे उतल्या उठल्या ब्लोग वरील वाचकांच्या प्रतिक्रिया बघायच्या असतात. अस्वस्थता वाढली होती. टी.व्ही. वर बातम्या बघून झाल्या. काय कराव कळेना शेवटी आजचा लोकमत वाचायला घेतला रागानेच बर का. मी रोज हेडलाईन्स व महत्वाच्या बातम्याच वाचतो. आज मात्र पूर्ण पेपर वाचून झाला. मंथन पुरवणी वाचतांना शेवटच्या पानावर इंटरनेट addiction वरील दोन लेख हमखास वाचले. मला तो लेख वाचून खरोखर आपल्याला हि IAD हा रोग जडला आहे असे वाटू लागले. माझी अस्वस्थता आणखीनच वाढली. आता तुम्ही म्हणाल हा अड्स सारखा रोग कोणता. तर त्याचे पूर्ण नाव आहे Internet Addiction Disorder. ह्या रोगाच्या निवारणसाठी अमेरिकेमध्ये व्यसन मुक्ती केंद्र सुरु झाल आहे अस त्या बातमीत छापलं होत. मला मनोमन वाटायला लागल आपण सुद्धा अस केंद्र येथे सुरु कराव व त्यातील पहिला रुग्ण म्हणून स्वतःच भरती व्हाव.

आता २.३० वाजता मी काम्पुटर वर बसू शकलो आणि हि post  तयार करून टाकली. इतका वेळ काम्पुटर पासून दूर राहून मला व माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना आपण करू शकतात.