२५ पुर्ण

२५ म्हणजे पाव! हो न? हा २५ चा आकडा आयुष्यात फार महत्वाचा मानला जातो. २५ दिवस, २५ महिने, २५ वर्ष यांना फार महत्व असत. त्यानंतर ५०, ७५ आणि शेवटी १००. यांना महत्व दिल गेल आहे. २५ म्हणजे सिल्वर जुबली, ५० म्हण्जे गोल्डन, ७५ महणजे ्डायमंड आणि १०० शतक.

आयुष्यात असे दिवस येतात कि ते आठवणित राहतात. मुलगा/मुलगी २५ वर्षाचे झाले की त्याला महत्व असते. तसेच लग्नला २५ वर्ष झाली की तो दिवस साजरा केला जातो. आज आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस. आम्ही साजरा केला नाही, पण हा दिवस कायम आठवणित राहावा म्हणुन हा प्रपंच.

१५ जुन १९८६ ह्या दिवशी आम्ही कायमचे एक दुजे चे झालॊ होतो. म्हनजे आमचे लग्न झाले होते हो. प्रेम विवाह नव्हे. २५ वर्ष कशी संपली काही कळलेच नाही. जीवन कसे असावे? चटपटीत जेवणासारखे! त्यात सर्व माल मसाले असले तरच मजा येते. नाही तर जेवण संपले तरी पोटात भुक राहाते.

तसेच जीवनाचे ही असते. सहज तर सर्वच जगतात. त्यात थोडे मिठ, मसाले घातले कि जीवनाचा स्वाद बदलुन जातॊ. खुप प्रेम, मधुनच भांडण, मग त्यावर लोणी लावणे, आणि मग लोणचं तोंडी लावून मजेदार जगणे म्हण्जे जिवन.

असेच जीवन जगुन आयुष्याची ही २५ वर्ष संपवली.

उपरवाल्याने चप्पर फाड के दिलेली अफाट दुःख फुलासारखी आनंदाने झेलत इथ पर्यंत आलो आहोत. त्याच्या क्रूपेने पुढील आयुष्य सुखाचे जावो हीच प्रार्थना आहे.

भविष्यकालीन जीवन

आपल्या संस्कृतीत एकदा लग्न झाले की आपली पत्नी, मग मुल, आपला संसार यात मनुष्य गुंतून पडतो. त्यांच्यासाठी झटणे हेच माणसाचे कर्तव्य असते. पण पुढे काय वाढून ठेवले आहे हे ह्या ज्योक वरूनच लक्षात येईल.

मी दोन मुलांना बोलतांना ऐकले. एक दुसर्याला मोबाईलमध्ये आलेला एस एम एस वाचून दाखवीत होता. तो मेसेज असा होता की बायको आपल्या नवर्याला सांगते. “ Honey, your kids and my kids are beating our kids.”

घरोघरी मातीच्या…………

तो घरी येतो, बेल वाजवितो, ती दार उघडते, ती स्मित हास्याने त्याचे स्वागत करते, तो आनंदित होतो. बाळ ‘बाबा आले, बाबा आले’करीत धावत त्याच्या जवळ येते, तो ‘अरे पिंट्या ये ये’ करीत त्याला उचालण्यासाठी हात पुढे करतो आणि ‘अरे काय करतो आहे, ते हात धू आधी; मग त्याला जवळ घे. किती वेळा सांगावे ह्या माणसाला लक्ष्यातच ठेवत नाही हा.’ आणि त्याचा पचका होतो. तो लागलीच हात मागे घेतो. रागे रागे बेडरूम मध्ये जावून कपडे बदलतो आणि वाश घेतो.

तो वाश घेऊन हॉलमध्ये येतो, पिंटयाशी लाड करतो टी.व्ही. बघता बघता तिच्याशी हि गप्पा मारतो. बराच वेळ होतो. मग तीविचारते,’अरे,आज तुझा आवडता बेत करते मी सांग बर तुला काय हव आहे.’ तो विचार करतो आणि तिला मनातील पदार्थ सांगतो,’तू आज कि नाही छान पैकी वांग्याची मसालेदार भाजी कर.’ पण तो काय बोलत आहे त्याकडे तिचे लक्षच नसते. आणि टी स्वयंपाक घरात निघून जाते. थोड्यावेळाने ती बाहेर येते आणि ‘चला चला जेवण करून घ्या.’ म्हणते. तो पिंट्याला घेऊन बेसिन कडे जातो, दोघे हात धुतात आणि डायनिंग टेबल वर येऊन ताट वाढण्याची वाट बघतात. त्याचे लक्ष्य बातम्यांकडे असते. तो ताट वाढल्यावर जेवण सुरु करतो तर ताटात वेगळीच भाजी असते. ‘आग तू तर मी वांग्याची भाजी करायला सांगितले होते. मग हे काय?’ ‘अरे काय करू सुचतच नव्हते कंटाळा पण आला होता म्हणून हि सोपी भाजी केली मी.’ झाला त्याचा दुसऱ्यांदा पचका होतो. तो बिचारा काय करणार तीच भाजी खातो म्हणण्यापेक्षा ढकलतो कशी तरी.

‘चला आता रात्रीचे आठ वाजले आहेत आपण जवळच माझा मित्र राहतो त्याने घरी बोलाविले आहे, त्याच्या कडे जाऊन येऊ.’ ती खुश होते. ‘अरे पण मी कोणती साडी नेसू सांगशील का मला?’ त्याला विचारते आणि पटकन एक साडी आणून दाखविते. ती त्याची आवडीची साडी असते.’तो लगेच म्हणतो,’आग हीच साडी घाल तू.ह्या साडीत तू सुंदर दिसतेस.’ त्याचे बोलणे संपायच्या आत ती परत गेलेली असते. तयार होऊन बाहेर येते आणि ‘चला’ म्हणते. तो तिच्याकडे बघतो आणि ‘डोक्याला हात लाऊन घेतो,’अग तुला मी ती साडी नेसायला सांगितली होती न!’ ‘अरे हो रे पण माझा ही साडी नेसायचा मुड झाला म्हणून मी हीच नेसले.’ तो काय बोलणार गप्पा बसला.

मनातल्या मनात म्हणाला’कोणी तरी शहाण्या माणसाने म्हटले आहे कि बायकांपुढे जास्त बोलू नये त्या नवर्याने सांगितलेले कधीच ऐकत नाहीत आणि त्याने जे सांगितले त्याच्या उलटेच करतात.

घरो घरी असेच घडत असते का हो? विचार करून तो थकला आणि झोपी गेला सकाळी उठून पुनः तेच सहन करण्यासाठी.

म्हातारपण- एक शिक्षा?

ती चार चार मुलांची आई झाली तेव्हा केव्हढा आनंद झाला होता तिला. मला मालमत्ता-धन दौलत काही नको देवा. ही माझी सोन्या सारखी मुल म्हणजे माझी दौलत आहे. मी मोल मजुरी करीन आणि या माझ्या सोन्यांना मोठ करीन, खूप शिकवीन, मोठी झाली की ही सर्व माझी जीवापाड काळजी घेतील.

ती रात्रंदिवस मेहनत करून घर चालवायची. नवर्याचा फारसा काही उपयोग होत नव्हता. मुलांना वडील आवश्यक असतात म्हणूनच नाही तर. असो तिने जीवापाड आपल्या पिल्लांना जपल आणि मोठ केल. मुल हुशार होती. मोठा शाळेत कायम पहिला यायचा. ते पाहून दुसरा मग तिसरा आणि सर्वात छोटा तर त्यांच्यापेक्षा ही सरस. तो तर जिल्ह्यात मग राज्यात सुध्दा पहिला आला.

दरम्यान मोठा इंजिनिअर झाला आणि एका मोठ्या कंपनीत कामाला लागला. आता आईच्या खांद्यावरील भार थोडा कमी झाल्याचा भास तिला झाला.  मोठा रोहन सुटीच घरी आला व आईला म्हणाला “अग आये, आता तू म्हातारी झाली आहे. आता तू घरी बस पाहू. काम करणे आता सोडून दे.”

“अरे, माझ्या छकुल्या तू केव्हढा मोठा झाला आहे. मला आता ग्यान शिकवितो आहे. अरे मी घरी बसून कस चालल रे. घर कोण चालविल. तुझा बा.”

“अग, त्याने कधी चालविल आहे की आता चालविल. पण म्या म्हणतो मी चालविल की.”

त्या दोघी  मायलेकांच अस भांडण रात्र भर चालत राहील. शेवटी आय ने थोडे काम कमी करायचे ठरविले. आणि रोहनला लग्न करण्यासाठी थोडी बचत करायच्या सूचना द्यायला ती विसरली नाही.

काळ भराभरा निघत होता. एक एक करून चार ही मुल कामाधंद्याला लागली. मोठा एका मोठ्या कंपनीत लठ्ठ पगारावर होता. दोन नंबरचा शिकला पण त्याची मित्र मंडळी व्यापार्यांची मुल होती म्हणून त्याने त्यांच्या सोबत व्यवसाय करायचे ठरविले. तिसरा सरकारी नौकरीला लागला. आणि सर्वात लहान हा आय. टी. कंपनीत नौकरीला होता.

एव्हाना चौघांचे लग्न झाले होते. चौघे खूप शिकले आणि खूप कमवायला लागल्याने त्यांना आईने स्वतःची स्वतंत्र घर घ्यायला लावली. हळू हळू सर्वांनी स्वतंत्र संसार थाटला.

तिने मुलांना चांगले संस्कार लावल्याने ते मोठे झाले, समाजात नाव कमविल, पण ती आपली गावंढळच राहिली. तेच राहणीमान व तेच बोलणे चालणे.

आता पर्यंत ती लहान लेकाकडे राहत होती. त्याचे लग्न झाले आणि आता तिने मोठ्याला म्हटले. बाळा आता मी काही दिवस तुझ्या कडे राहायला येते. तिचे वाक्य पूर्ण होईपर्यंत त्याच्या बायकोच्या कपाळावर लाखो रेषा तयार झाल्या होत्या. त्याने ते तिचे रूप पहिले. आणि आईची समजूत घालायच्या आत ती म्हणाली, “अहो, आपल्या कडे घरी कोणीच नसते. त्यामुळे आईंकडे कोण लक्ष पुरविणार. आणि जर का आई आजारी पडल्या तर काळजी घ्याला आहे का कोणी?”

“मी काय म्हणतो आई, सध्या छोटूला तुझी गरज आहे. म्हणून काही दिवस येथेच राहा मग आम्ही घेऊन जाऊ तुला.” त्याने कशी तरी आईची समजूत घातली. ती भोळी तिला त्यांचा डाव उमगलाच नाही.

त्यांचा तो डाव मात्र छोटू व त्याच्या पत्नीने ओळखला होता. ती नवीन असल्याने अद्याप तिने पंख पसरवायला सुरुवात केलेली नव्हती. त्याला  आई आवडायची म्हणून तो गप्प बसला.

असेच काही दिवस गेले आणि इतक्यात छोटीला दिवस गेल्याचे कळले. मग तिची आता छोटयाकडे जास्त गरज जाणवायला लागली. बघता बघता एक वर्ष कस निघून गेल काही कळल नाही. छोट्याच बाळ आजोळून आपल्या घरी आल आणि आजीच्या हृदयातून आनंद ओसंडून वाहु लागला.

झाले मोठ्यांना आईपासून लांब राहण्यासाठी आणखी एक कारण सापडल.

ते बाळ सात महिन्याचे झाले आणि त्याच्या आईने एके दिवशी त्याच्या वडिलांना सांगितले.” अहो आता आपल बळ मोठ होत आहे. त्याला चांगले संस्कार होतील अशी एक आया शोधायला सांगा कोणाला. शक्य तो इंग्रजी बोलणारी हवी.”

आईने ते ऐकले आणि तिचे मन चपापले. तिला कळले की पाखराने पंख पसरवायला सुरुवात केली आहे. तिच्या मनात आता चलबिचल सुरु झाली होती. लगेच बोलणे योग्य नव्हे म्हणून ती तिसर्या दिवशी छोटूला म्हणाली, “ बेटा, जरा आपल्या भावांना उद्या बोलावून घे. म्हणावं आईने भेटायला बोलाविले आहे. आणि हो सोबत आपल्या पिल्लांना जरूर आणायला सांग.”

त्याने लागलीच तिघांना मोबाईलवर फोन लावला. निरोप दिला आणि काही प्रतुत्तर येण्यापूर्वीच फोन बंद करून टाकला.

रविवारी ठरल्यानुसार तिघे छोटुकडे जमा झाले. सोबत त्यांची मुलं सुध्दा होती. सर्व मुलं एकत्र जमल्याने गोंधळ उडाला होता. मोठ्यांच्या गप्पा सुरु होत्या. आई शांत होती. तिच्या मनात चल-बिचल होत होती मन आतून अस्थिर होते.

अचानक मोठ्या मुलाने विषयाला हात घातला. “अग आये, तू आम्हाला का बोलाविले आहे?”

“सांगते. ऐ बाळांनो इकडे आजी जवळ या बर.” तिने सर्व मुलांना हाक मारली तसी मुलं धावायला निघाली पण अचानक आहे तेथेच उभी राहिली. ती समजली प्रत्येकाच्या आयांनी त्या मुलांना आजी जवळ जाऊ नका असे खुणावले होते.

“बर असू द्या.”

“अरे, मी अशी गावंढळ, माझ्या जवळ राहून तुमच्या मुलांवर कसले संस्कार पडतील. मला आता दिसेनासे झाले आहे. आता माझे काय करणार आहात तुम्ही. गावाकडे ही काही ठेवले नाही, त्यामुळे तिकडे ही जाऊन उपयोग नाही.”

सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित दिसून येत होते. छुपे स्मित. तिने ते ताळले. आणि शांत बसून राहिली.

हळू हळू हालचाल जाणवायला लागली. मोठी म्हणाली,”मला असे वाटते आता आपल्या कोणाकडे ही आईकडे लक्ष पुरवायला वेळ नाही. आपण त्यांची चांगली काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे आईंना जर आपण एखाद्या महागड्या वृध्दाश्रमात ठेवले तर काय हरकत आहे.”

तिला हे अपेक्षितच होते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव उमटले नाहीत.

तिच्या मुलांना सुध्दा काहीच आश्चर्य झाले नाही. तिला असे जाणवले की हे सर्व त्यांनी ठरवून आले आहेत.

हॉल मध्ये असलेल्या मुलांपैकी लहानांना काहीच समजले नाही. म्हणून ते म्हणाले,”हे वृद्धाश्रम काय असते?”

ज्या मुलांना हे समजले होते त्यांच्या चेहऱ्यावर दुखाची झलक दिसून आली. त्यांनी मनात ल्या मनात काही तरी विचार केला आणि कसल्याही विरोधाला न जुमानता आजी कडे धून गेले आणि अक्षरशः आजी ला चिपकून रडू लागले.

त्यांच्या रडण्याचा त्यांच्या आयांवर कोणताही प्रभाव पडला नाही. त्यांनी रागावून रागावून त्यांना घराबाहेर पाठवून दिले आणि सर्वांनी मिळून आईला वृध्दाश्रमात भरती करण्याचा निर्णय घेतला. कोणत्या आश्रमात ठेवायचे हे ही ठरवूनच ते मोकळे झाले. मोठ्याकडे कागद पत्र होतीच.

ती देवाला म्हणाली,’वा देवा, मला जिवंतपणी चितेवर झोपवायची पूर्ण तयारी करूनच धाडलं आहे तू माझ्या लेकांना.”

दुसऱ्याच दिवशी तिची वृध्दाश्रमात रवानगी झाली. रात्र भरामध्ये ती इतकी कमजोर झाली की तिच्या कडून उठता सुध्दा येत नव्हते. दोघांनी तिला उचलून कारमध्ये बसविले, नव्हे कोंबले आणि शहरातील एका वृध्दाश्रमात भरती केले. आणि सर्व सोपस्कार आटोपल्यावर ते परत जायला निघाले तेव्हा छोटूला झट लागली आणि तो पडता पडता वाचला ते तिला जाणवले, आईच ती, म्हणाली,” सांभाळून जा रे बाळांनो, काही कारणाने डोळ्यात अश्रू आले तर या आईची आठवण जरूर काढा, आणि हो, मी गेले जमले तर मला पोहोचवायला जरूर या.”

बाय बाय नाशिक

या वर्षी माझी बदली होणार आहे अशी चर्चा माझ्या कानापर्यंत आली आणि अस्वस्थता वाढली होती. मला नाशिक मध्ये राहून १४ वर्ष झाली आहेत. मागील ७ वर्षापासून नाशिकातील माझ्या कार्यालयाशी तेथील कामाशी प्रेम आपुलकी निर्माण झाली आहे. ती आता नाहीशी होणार या कल्पनेने मन कासावीस होत होते. अचानक एके दिवशी एक फोन आला आणि माझी पुण्याला बदली झाली असे समजले. क्षणभरासाठी श्वास जगाच्या जागी थांबल्यासारखे झाले. शासकीय दौऱ्यावर होतो, लगेच फोन फोनी करून तपास केला बातमी खरी होती. मग मनाला समजावले आणि ते शांत झाले. अस्वस्थता कमी झाली.

पण ज्याक्षणी या कार्यालयातून बदली झाली हे समजले त्या क्षणी मला एक विचित्र जाणीव झाली. त्या क्षणी माझ्या मनाचा या कार्यालयाशी संबंध तुटला असे वाटले, हे कार्यालय परके वाटू लागले. आणि हळूहळू मनाची ओढ नव्या कार्यालय कडे होत गेली. हे मन असेच असते का? मी खूप विचार केला. मुलीला सांगितले. एखाद्या मुलीचे लग्न जुळले कि ती परकी हून जाते तेव्हा तिच्या मनाची काय घालमेल होत असेल? तिला त्या क्षणी माहेर परके वाटत असेल का? आणि सासरची ओढ जाणवत असेल का? हे मी माझ्या अर्धांगिनीला विचारले. तिने हसून होकार दिला.

आणि तो दिवस उजाडला २३ जून २०१० रोजी मी पुणेकर झालो. पुण्याला नवीन कार्यालयात हजर झालो. नवीन कार्यालयातील स्टाफ खुपच आवडला. सहयोगी खूप चांगले आहेत. मदत करत असतात. सहकार्य करतात. ज्या दिवशी मी पुण्याला हजार झालो त्या दिवशी श्री सुरेश पेठे साहेब माझी आतुरतेने वाट पाहत होते. त्याच दिवशी आम्ही भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला.

प्रथम मी एकट्याने पुण्याला राहायचा निर्णय घेतला होता. पण हळू हळू मला जाणवायला लागले कि एकटे राहणे शक्य नाही. लॉज वर राहणे बाहेरचे  खाणे,  बाहेरचा चहा पिणे मला अवघड जायला लागले. इकडे मुलगी आणि सौ. एकटेच त्यामुळे माझे सर्व चित्त त्यांच्यात. दुसऱ्या- तिसऱ्या दिवसा पासून मनाची ओढ घराकडे व्हायची. अस्वस्थता वाढायला लागायची. आता मला जनावायाले लागले होते कि पक्षी रोज सायंकाळी घराकडे का वळतात? आता मला घराचा विरह काय असतो त्याची जाणीव व्हायला लागली होती. एकटे राहिल्याने सिगारेट वरील ताबा सुटला होता. आणि एका महिन्यात मला जीना चढायला त्रास जाणवायला लागला होता. घरच्यांशी सल्ला मसलत करून मग सर्वांनी पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्यय घेतला.

आणि मग सुरु झाली माझी धावपड. कॉलेज मध्ये प्रवेश, घराची शोधाशोध. अनेक लोकांना भेटणे. घर बघणे. प्रत्येक घरामध्ये काही न काही त्रूटी सापडायच्या. कोठे घर लहान, कोठे घर पसंद पडायचे तर वेस्टर्न कमोड असायचे. शेवटच्या दिवशी पौड रोडवर एक पसंतीचे घर मिळाले आणि लगेच घेऊन टाकले.

आता नाशकातून काही वर्षांसाठी का होईना बाहेर राहणार आहोत. पुढील बदली होईपर्यंत तरी. नाशकात स्वतःचे घर आहे त्यामुळे अधून मधून चक्कर असणारच.  पण आता या पुण्या नगरीला बाय बाय करायची वेळ आलेली आहे.

बाय बाय नाशिक…………..

मी पुणेकर होतोय!

चिमणी पाखर काही दिवस एका झाडावर घरट करुन राहतात. तेथील दानापाणी संपल की ते आपल गर सोडुन जेथे दानापाणी मिळेल तेथे जाऊन राहतात. पण नौकरदारांच अस नसत. नौकरी म्हटली की बदली ही आलीच. एकाच ठिकाणी जास्त वेळ रहाता येत नाही. माझे ही तेच झाले आहे. कालच कळले की माझी बदली पुण्याला झाली आहे. मी आनंदित झालो. पुण्यासारख्या शहरामधे रहाणे म्हनजे मागच्या जन्मी आपण काही तरी पुण्य केले असावे असेच आहे. नावाजलेले शहर आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणुन ही ख्याति प्राप्त झाली आहे ह्या शहराला.

१३ मे १९८५ रोजी मी खाजगी कंपनी सोडुन सरकारी कार्यालयात रुजु झालो. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असल्याने पाट्बंधारे खात्यात जल विद्युत शाखेत नौकरी मिळाली. राजपत्रित अधिकारी म्हणुन नौकरी असल्याने अत्यानंद झाला. लहाणपणी मी जेव्हा अभियंत्यांकडॆ अटेस्टेशन करायला जात होतो तेव्हा मला त्यांचा हेवा वाटत होता. आज आपण राजपत्रीत अधिकारी होत अस्ल्याचा आनंद मिळत होता. म्हणुन लगेच नौकरी पकडली.

नौकरीला लागलो ते डिजाईन चे ओफ़िस होते. सुरुवात डिजाईन इंजिनिअर म्हणुनच झाली. मुळात पिंड काम करण्याचा. लहाणपणापासुनच कामे करुन घराला् हातभार लावला होता. खरे सांगायचे तर इंजिनिअरिंग सुध्दा ट्युशन करुन, कंपनीत नौकरी करुन पुर्ण केले होते. तोच कामाचा पिंड सुरु ठेवला. आज ही आहेच. याचा फायदा असा झाला की कामामध्ये कधीच अडचण आली नाही. कसे ही आणि किती ही कठीण काम असले तरी ते करू शकतो असे मला वाटते.

मुंबईचे आकर्षण कोणाला नसते. मला ही होतेच म्हणून पहिल्या प्रथम मुंबईमधील कार्यालातच नौकरी मिळाली. तेथूनच सुरुवात झाली. १९८५ ते २००३ मुंबईमध्ये कार्यरत होतो. नंतर नाशिक येथे बदली झाली. काम पूर्णतया वेगळे होते. तरीही successfully पार पडले.  आज सकाळीच मी नाशिक येथून सुटलो. २३ जून रोजी पुणे येथील कार्यालयात हजार व्हायचे आहे. तेथे सुध्दा चेलेन्जिंग जोब आहे असे आज मला एक सहकारी बोलून गेला. मनाची तयारी आहेच. मुंबई जसे आवडत होते तसे पुणे सुध्दा आवडीचे शहर आहे. त्यामुळे आता पुण्याला जायचे वेध लागले आहेत. नवीन कार्यालय असेल. नवीन सहपाठी असतील.

राहायची व्यवस्था अद्याप झालेली नाही. ती करावी लागेल. कसे होईल देव जाणे. असो देव आपल्या पाठीशी आहेच.